क्रिकेटमध्ये एकादा फलंदाज धावबाद कधी होतो, हे सर्वांना माहिती आहे. धाव घेत असताना क्रिजमध्ये पोहचण्याच्या आत समोरील क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाजाने चेंडूने स्टम्प उडवला तर फलंदाज धावबाद घोषित केला जातो. मात्र बुधवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका टी-२० सामन्यात लंकन गोलंदाज लक्षन संदकनने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला धावबाद करण्याची सुवर्णसंधी दवडली.

संदकन गोलंदाजी करत असताना स्टिव्ह स्मिथ नॉन-स्ट्राईक एंडवर उभा होता. समोरील फलंदाजाने मारलेला फटका हा थेट स्टम्पवर येऊन आदळला. यादरम्यान स्मिथ धाव घेण्यासाठी पुढे निघाला होता. मात्र चेंडू तिकडेच थांबल्यामुळे संदकनला स्मिथला धावबाद करण्याची संधी होती. मात्र घाईघाईत संदकनने ज्या हातात चेंडू नव्हता तोच हात स्टम्पला लावला आणि स्मिथ थोडक्यात बचावला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

दरम्यान या सामन्यात वॉर्नर आणि स्मिथने झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर ९ गडी राखून मात करत मालिकेतही बाजी मारली.