पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यामध्ये भारताविरुद्ध दमदार कामगिरी करत स्वत:च्या संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या सलामीच्या फलंदाजांना तंबूत धाडणाऱ्या शाहीनच्या या कामगिरीमुळेच २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला दुबईत झालेल्या यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या भारत आणि पाकिस्तानीमधील पहिल्याच सामन्यात १० गडी राखून विजय मिळाला होता. शाहीनने ३१ धावा देत तीन बळी घेतले होते. त्याने केलेल्या या तुफान गोलंदाजीमुळेच पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. याच कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला पराभूत केलं. शाहीनने आधी रोहित शर्माला बाद केलं, त्यानंतर के.एल. राहुलला माघारी पाठवं आणि नंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीचीही विकेट शाहीननेच काढली.

पाकिस्तानने भारतावर ऐतिहासिक विजयासह रूबाबात टी-२० विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ केला. त्यानंतर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानवरही शानदार विजय मिळवले. त्यामुळे ‘अव्वल-१२’ फेरीतून गटविजेते म्हणून ते उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्यफेरीमध्ये ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहेत.

एकीकडे पाकिस्तानने चांगली कामगिरी केली असताना दुसरीकडे भारताला पाकिस्तानबरोबरच न्यूझीलंडकडून मोठा पराभव स्वीकारावा लागल्याने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियावर मोठा विजय मिळवूनही भारतीय संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला. पाकिस्तानने साखळी फेरीमधील त्यांचा शेवटचा सामना रविवारी स्कॉटलंडविरोधात खेळला. या सामन्याच्या आधीच पाकिस्तानने उपांत्यफेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केलेला.

नक्की वाचा >> रिझवानने भेट म्हणून हेडनला दिली कुराणची प्रत; हेडन म्हणतो, “मी ख्रिश्चन असलो तरी…”

स्कॉटलंडविरोधातील सामन्यात समोर दुबळा संघ असल्याने आणि उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित झाल्याने खेळाडूंवर ताण नव्हता. यामुळेच शाहीन आफ्रिदीही मजा मस्करीच्या मूडमध्ये असल्याचं दिसून आलं. तो बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करत असताना पाकिस्तानी चाहत्यांना शांत बसून राहण्याऐवजी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रवृत्त करत होता. या वेळी चाहत्यांनाही त्याला रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि विराट कोहली बाद झाल्यानंतरचा प्रतिसाद कसा होता हे अभिनय करुन दाखवण्यास सांगितलं. याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

नक्की वाचा >> “बाबरबद्दल मी असं म्हणालोच नव्हतो, मी फक्त…”, पाकिस्तानी चाहत्यांनी व्हायरल केलेल्या Fake Tweet वर हर्षा भोगलेंचा भन्नाट रिप्लाय

व्हायरल व्हिडीओमध्ये चाहते आधी रोहित शर्माच्या नावाने ओरडू लागतात. त्यानंतर शाहीन लगेच रोहित एलबीडब्ल्यू बाद झाल्यानंतर त्याने कशी रिअॅक्शन दिलेली त्याची नक्कल करुन दाखवतो. त्यानंतर चाहते राहुलच्या नावाने ओरडू लागतात तर शाहीन राहुल बाद झाल्यानंतर त्याने काय केलं हे करुन दाखवतो आणि चाहते एकच कल्ला करु लागतात. शेवटी चाहते विराटच्या नावाने ओरडतात तेव्हा शाहीन विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याने कशापद्धतीने प्रतिसाद दिलेला याची नक्कल करुन दाखवतो.

नक्की वाचा >> २०१७ मध्येच क्रिकेट सोडण्याच्या विचारात असणारा खेळाडूच आज न्यूझीलंडला T20 World Cup फायनलमध्ये घेऊन गेला

या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी शाहीन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय तर काहींनी हा प्रतिस्पर्धी संघाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.