Kamran Akmal Viral Video: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले आपले आवडते खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने इंग्लंड चॅम्पियन्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानचा संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. पाकिस्तानने पहिल्या डावात ९ गडी बाद १६० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड चॅम्पियन्स संघाला १५५ धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन संघाचा यष्टिरक्षक कामरान अकमलने असं काही केलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानचा संघ आपल्या क्षेत्ररक्षणासाठी नेहमीच चर्चेत असतो. चांगलं करतात म्हणून नाही, तर सोपे झेल सोडणं आणि बरंच काही. या सामन्यातही कामरान अकमलकडे फलंदाजाला यष्टीचीत करण्याची सोपी संधी होती. मात्र, त्याने ती संधी गमावली. ही संधी सोडल्यानंतर कामरान अकमलने जे काही केलं, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

तर झाले असे की, इंग्लंड चॅम्पियन्स संघ धावांचा पाठलाग करत असताना पाकिस्तान चॅम्पियन्स संघाकडून शोएब मलिक गोलंदाजीला आला. सहाव्या षटकातील पहिला चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. या चेंडूवर फलंदाज फिल मस्टर्डने पुढे जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला.

चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त फिरला. कामरान अकमलकडे यष्टीचीत करण्याची सोपी संधी होती. पण, त्याने ही संधी गमावली. चेंडू त्याच्या हातात बसलाच नाही. दरम्यान चेंडू सुटल्यानंतर चेंडू नेमका गेला तरी कुठं, हे देखील त्याला माहीत नव्हतं. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या संधीचा फायदा घेत, मस्टर्ड पुन्हा क्रिझमध्ये परतला. चेंडू कामरान अकमलच्या ग्लोव्हजला लागून उडला. त्यामुळे त्याला २३ धावांवर जीवदान मिळालं. पण हे पाहून समालोचन आणि क्रिकेट चाहत्यांना हसू आवरता आलेलं नाही.