पश्चिम बंगालच्या खेळाडूंची भारतीय महिला रग्बी संघात निवड

त्यांनी कधी इमारती पाहिल्या नाहीत.. बस, मेट्रो, लोकल ट्रेन हे काय असतं, हे त्यांच्या गावीही नाही. घनदाट जंगल आणि चहाचे मळे हेच काय ते त्यांचे विश्व. पण तरीही शिकण्याची जिद्द फार. शाळेत जाण्यासाठी ८-९ किलोमीटर सायकलचा प्रवास नित्याचाच. चहाच्या फॅक्टरीमधून आलेल्या गाडीतून कधीतरी शाळेत जायला मिळणं, म्हणजे त्यांच्यासाठी अपूर्वाईच. त्यातही मुलगी म्हणून जन्माला आल्याने समाजातील पिढीजात रूढी-परंपरांची बेडी पायात गुरफटलेली. पण काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये धमक, जिद्द आणि चिकाटी होतीच. या त्रिसूत्रीच्या जोडीला अथक मेहनत घ्यायची तयारीही. प्रबळ इच्छाशक्तीनेच त्यांना मार्ग दाखवला आणि आता या पंचकन्या ‘रग्बी’ने दाखवलेल्या आशेच्या किरणांचा पाठलाग करत सातासमुद्रापार उड्डाण घेणार आहेत. भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या रग्बी संघातील रिमा ओराओन, लक्ष्मी ओराओन, पूनम ओराओन, संध्या राय आणि सुमन ओराओन या पाच जणींची ही कहाणी. भारताचा हा संघ पॅरिसच्या दौऱ्यावर जात असून या पाच जणींना आता आकाशही ठेंगणे झाले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी आणि मनाशी केलेल्या निर्धाराच्या बळावर पश्चिम बंगालमधील जलपैगुरी जिल्ह्यतील सरस्वतीपुरी गावातल्या या पाच खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवले. ७ ते १३ जुलै या कालावधीत पार पडणाऱ्या पॅरिस जागतिक स्पर्धेत भारताचा मुलींचा रग्बी संघ सहभागी होत आहे. ८ ते ९ जुलै दरम्यान रग्बी सेव्हनचे सामने होणार असून भारतीय संघात स्थान मिळवल्याने या पाचही मुली पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणार आहेत.

‘बालपणापासून चहाचे मळे आणि निसर्गाने वेढलेले जंगलच आम्ही पाहत आलो आहे. त्यामुळे पहिल्यांदा एका स्पध्रेच्या निमित्ताने कोलकाताला गेल्यावर उंच उंच इमारती पाहून आश्चर्य वाटले. आपण हे कोणत्या जगात आलोय, हेच कळत नव्हते. सर्व काही नवीन होते,’’ असे सुमन सांगत होती. तिच्या बोलण्यातला निरागसपणा डोळ्यातूनही झिरपत होता. त्याचबरोबर भारताबाहेर जाण्याचा आनंदही डोळ्यांत दिसत होता. पण, हा इथवरचा त्यांचा प्रवास सोपा नक्की नव्हता.

मुख्य शहरांपासून कोसो दूर त्यांचे गाव आहे. तेथील लोकांची मानसिकता अजूनही पिढीजात परंपरांच्या जाचात अडकलेली आहे. त्यांचे मन वळवण्यासाठी या मुलींनी प्रचंड प्रयत्न केले आणि अखेर यामध्ये त्यांना यश मिळाले. ‘‘आमच्या घरच्यांनीही सुरुवातीला विरोध केला. तोकडे कपडे घालून मुलींना खेळू देण्यास, त्यांची तयारीच नव्हती. त्यात शेजाऱ्यांचा टोकाचा विरोध होताच. पण, आम्हीही खेळाच्या जोरावर ही नकारात्मक भावना संपुष्टात आणण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरलो. निदान आता घरचे तरी आम्हाला पाठिंबा देऊ लागले आहेत,’’ असे रिमा व लक्ष्मी या सांगत होत्या.

या पाचही मुलींचे आई-वडील चहाच्या मळ्यात मजुरी करतात. कोलकाता येथील ‘जंगल क्रो’ या क्लबने सरस्वतीपुरीतील या मुलींना घडवले. रग्बी या खेळासाठी कार्य करणाऱ्या या क्लबने येथील मुलींना हा खेळ शिकवला आणि त्यांच्या या मेहनतीला या मुलींनीही यशस्वी वाटचाल करत पोचपावती दिली. रिमा, लक्ष्मी, पूनम, संध्या आणि सुमन यांच्या यशानंतर गावातील इतर मुलीही खेळाकडे वळल्या आहेत आणि उज्ज्वल भविष्यासाठी झटू लागल्या आहेत. याबाबत पूनमने सांगितले की, ‘खेळाच्या निमित्ताने आम्ही देशभर प्रवास करू लागलो आणि आता परदेशात जाणार आहोत. या यशाने आमच्या गावातील संकुचित विचारसारणी असलेल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. पूर्वी आम्हाला विरोध करणाऱ्यांनाही खेळाचे महत्त्व कळू लागले आहे आणि विशेषत: मुलींवरील काही प्रमाणात बंधने कमी झाली आहेत.’’

महाराष्ट्राची एकमेव खेळाडू : भारताचा १८ वर्षांखालील मुलींचा रग्बी संघ ‘पॅरिस जागतिक स्पध्रे’साठी येत्या शुक्रवारी रवाना होणार आहे. ७ ते १३ जुलै या कालावधीत पार पडणाऱ्या या स्पध्रेत फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, रग्बी सेव्हन आणि व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे. १२ खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाचे नेतृत्व ओदिशाची सुमित्रा नायक करणार आहे. गार्गी वाळेकर ही महाराष्ट्राची एकमेव खेळाडू राष्ट्रीय संघात स्थान पटकावण्यात यशस्वी ठरली आहे. भारतीय संघ : सुमित्रा नायक (कर्णधार), बसंती पांगी, रजनी साबर, लिजा सरदार, सोनी मंदांगी (सर्व ओदिशा), रिमा ओराओन, लक्ष्मी ओराओन, पूनम ओराओन, संध्या राय आणि सुमन ओराओन (सर्व पश्चिम बंगाल), गार्गी वाळेकर (महाराष्ट्र), सुल्ताना (दिल्ली).