West Indies Will Wear Costliest Jersey In The World: लेजेंड्स क्रिकेट लीग स्पर्धांता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता निवृत्त झालेल्या खेळाडूंच्या वर्षातून ४ ते ५ क्रिकेट लीग स्पर्धा होतात. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू मैदानावर तुफान फटकेबाजी करताना दिसतात. १८ जुलैपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट लीग स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत जगातील ६ देशातील दिग्गज खेळाडू ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. ज्यात वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघाचा देखील समावेश असणार आहे. यावेळी वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघ हटके जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.
ही स्पर्धा १८ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेतील सामने बर्मिंघम, नॉर्थम्पटन, लीसेस्टर आणि लीड्सच्या मैदानावर रंगणार आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा चॅम्पियन संघ १८ कॅरेट सोन्याने मढवलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. ही जर्सी ३० ग्रॅम, २० ग्रॅम आणि १० ग्रॅम एडिशनमध्ये उपलब्ध आहे. ही खास डिजाईन यूएईच्या लॉरेंजने तयार केली आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू ही खास जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.
वेस्ट इंडिज संघासाठी खास जर्सी
या स्पर्धेत वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघाचे मालक असलेले अजय सेठी म्हणाले, ” वेस्ट इंडिज संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. ही खास जर्सी वेस्ट इंडिजच्या सर्व दिग्गज खेळाडूंना समर्पित करण्यात आली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स ही जगातील सर्वोत्तम भारतातील सर्वोत्तम स्पर्धांपैकी एक आहे. यावर्षी या स्पर्धेची ट्रॉफी जिंकणं हे आमचं स्वप्न आहे.”
या स्पर्धेसाठी असा आहे वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा संघ:
ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, शेल्डन कॉटरेल, शिवनारायण चंद्रपॉल, चॅडविक वॉल्टन, शनन गॅब्रियल, अॅशले नर्स, फिडेल एडवर्ड्स, विलियम पर्किन्स, सुलेमान बेन, डेव मोहम्मद, निकिता मिलर.
ही स्पर्धा लाईव्ह कुठे पाहता येणार?
या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. या स्पर्धेतील सामने भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सुरू होतील. ज्या दिवशी या स्पर्धेत डबल हेडरचे सामने असतील, त्यादिवशी पहिला सामना संध्याकाळी ५ वाजता आणि दुसरा सामना रात्री ९ वाजता सुरू होईल. हे सामने तुम्ही फॅनकोडवरही लाईव्ह पाहता येऊ शकतात.