कॅरेबियन व्यथा!

‘‘आमच्या राष्ट्रीय निवड समितीत आता बदल झाला असून नव्या सदस्यांची नेमणूक झाली आहे.

|| ऋषिकेश बामणे

‘‘आमच्या राष्ट्रीय निवड समितीत आता बदल झाला असून नव्या सदस्यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी संघात निवड होण्याची शक्यता बळावली आहे,’’ असा आशावाद वेस्ट इंडिजचा अष्टपैलू किरॉन पोलार्डने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या धडाकेबाज खेळीनंतर व्यक्त केला होता. मात्र निवड समितीमधील बदलानंतरही पोलार्डव्यतिरिक्त अन्य काही खेळाडूंचे नशीब पालटले नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये चांगले दिवस परतण्याची आशा असतानाच खेळाडू आणि क्रिकेट मंडळातील वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

वेस्ट इंडिजच्या क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष डेव्ह कॅमेरून हे या वादाला जबाबदार आहेत. २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकावर जेव्हा वेस्ट इंडिजने नाव कोरले त्या वेळी स्वत: कर्णधार डॅरेन सॅमीने पत्रकार परिषदेत संघातील वरिष्ठ खेळाडू आणि निवड समिती सदस्य यांच्यात सुरू असलेल्या वादावर मोकळेपणाने भाष्य केले होते. पगार वाढवून मागणारे, स्वहक्कासाठी भांडणारे खेळाडू अशा नानाविध कारणांच्या आधारावर कॅमेरून यांनी विशेष यादी तयार करून या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा सापळाच जणू रचला आहे. याचमुळे वेस्ट इंडिजला दोन वेळा (२०१२, २०१६) ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या कर्णधार सॅमीचे संघातील स्थान गेले. त्याशिवाय ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड यांसारख्या क्रिकेटपटूंनादेखील त्याचा फटका पडला. मुख्य म्हणजे २०१७च्या एका एकदिवसीय मालिकेत विंडीजच्याच डॅरेन ब्राव्होची मुलाखत सॅमी घेत असल्याचे चित्र पाहून त्यांच्यातील क्रिकेटची दुर्दशा सर्वासमोर आली. त्यामुळेच हे सर्व वरिष्ठ खेळाडू विंडीजचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी जगभरातील ट्वेन्टी-२० स्पर्धामध्ये दिमाखात खेळून पैसे कमावताना आढळतात.

यंदाच्या मार्च महिन्यात कॅमेरून यांच्या जागी रिकी स्कर्ट यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या समितीने गेल, आंद्रे रसेल यांना विश्वचषकासाठी संघात स्थान दिले, परंतु पोलार्ड आणि प्रतिभावान फिरकी गोलंदाज सुनील नरिन यांना वगळल्यामुळे पुन्हा नवा वाद ओढवला आहे. पोलार्ड आणि नरिन ‘आयपीएल’मध्ये आपापल्या संघासाठी गेली अनेक वर्षे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नसले तरी त्यांच्या संघात असण्यानेच प्रतिस्पर्धी खेळाडूंवरील दडपण वाढते.

सध्या भारतात चालू असलेल्या ‘आयपीएल’मध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू या मनोरंजनाच्या पर्वणीत स्वत:ची वेगळी दखल घेण्यास भाग पाडतात. ‘आयपीएल’च्या पहिल्या पर्वापासूनच विंडीजचा या लीगमध्ये दबदबा आहे. तेव्हाचे शिवनरिन चंद्रपॉल, रामनरेश सरवान ते आताचे अगदी आंद्रे रसेल, अल्झारी जोसेफ आपला यशस्वी ठसा उमटवत आहेत. ख्रिस गेलच्या फलंदाजीची स्फोटकता आतापर्यंतच्या प्रत्येक हंगामात दिसून आली आहे. मोक्याच्या क्षणी येऊन उपयुक्त फटकेबाजी किंवा हाणामारीच्या षटकात टिच्चून गोलंदाजी, अशी अष्टपैलू कामगिरी करण्यात विंडीजचे सर्वच खेळाडू पटाईत आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजची मक्तेदारी १९७५ आणि १९७९च्या पहिल्या दोन विश्वचषक क्रिकेट स्पर्धामध्ये सिद्ध झाली आहे. १९८३ मध्ये भारताने त्यांच्या साम्राज्याला पहिला धक्का दिला; परंतु कालांतराने वेस्ट इंडिजने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील वर्चस्व गमावले. कॅरेबियन बेटांवर गुणी खेळाडू आताही घडत आहेत; परंतु आर्थिक पेच, वादग्रस्त क्रिकेट मंडळ आणि खेळाडूद्वेष्टे धोरण यामुळे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटची अधोगती झाली आहे.

४० वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अखेरचे विश्वविजेतेपद जिंकले होते. आता बहुतांश नव्या दमाच्या खेळाडूंसह जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील हा संघ सज्ज होत आहे. विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशिक्षक रिचर्ड पायबस यांची हकालपट्टी करून फ्लॉयड रिफर यांच्याकडे प्रभारी प्रशिक्षकाची भूमिका सोपवण्यात आली. विश्वचषक स्पध्रेसाठी संघनिवड करण्याकरिता २३ मेपर्यंतची मुदत सर्व संघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणखी कोणते धक्कादायक निर्णय घेईल, याची उत्सुकता क्रिकेटजगताला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: West indies cricket

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या