What Are The Earpiece in Indian Cricketers Wearing: भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका २० जूनपासून सुरू झाली आहे. भारताचे दिग्गज खेळाडू नसलेल्या या मालिकेत भारताचा नवखा संघ कशी कामगिरी करणार, याची सर्वच जण वाट पाहत होते. पण भारताने पहिल्याच कसोटी सामन्यात दणदणीत कामगिरी करत ३५० अधिक धावांचा टप्पा गाठला. यादरम्यान मोहम्मद सिराज आणि भारताचे इतर खेळाडू कानाला काहीतरी लाल रंगाचं उपकरण लावून बसले होते. पण हे उपकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीचं पाचारण केलं. भारताने यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर उत्कृष्ट फलंदाजी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यशस्वी जैस्वालने इंग्लंडच्या धर्तीवर खेळत असलेल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावे केले. तर शुबमन गिलने भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावत दिग्गजांच्या मांदियाळीत आपलं स्थान पक्क केलं आहे.
लीड्सच्या मैदानावर भारताचे फलंदाज वादळी फटकेबाजी करत होते. यादरम्यान भारताच्या ड्रेसिंग रूमकडे कॅमेरा फोकस केल्यानंतर सुरूवातीला मोहम्मद सिराज कानाला एक लाल रंगाचं उपकरण लावून बसला होता. तर काही वेळाने भारताचे अनेक खेळाडू सपोर्ट स्टाफही ते उपकरण लावून बसले होते. पण हे उपकरण नेमकं काय आहे, पाहूया.
सामना सुरू असताना ड्रेसिंग रूममधील काही खेळाडू त्यांच्या कानात बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमधून कॉमेंट्री ऐकत होते. समोर क्रिकेटचे थरारक सत्र सुरू असताना खेळाडू नेमकं हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कानाला लावून काय करत होते, असा सर्वांना प्रश्न पडला होता. पण खरं तर, कानाला लावलेलं उपकरण खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सामना अधिक बारकाईने समजून घेण्यास मदत करतात.
हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लहान आकाराचं रेडिओ संच आहेत जे स्थानिक रेडिओ चॅनेलशी जोडलेले असतात, जेणेकरून सामना चालू असताना त्याची थेट कॉमेंट्री ऐकता येईल. हे उपकरण सहज खिशात ठेवता येते. या रेडिओ उपकरणासाठी सिग्नल स्ट्रेंथ सहसा मर्यादित असते. कधीकधी रेंज स्टेडियम किंवा खेळण्याच्या क्षेत्रापुरती मर्यादित असते किंवा कदाचित काही ब्लॉक्सपर्यंत मर्यादित असते. केवळ क्रिकेट मैदानच नाही, तर हे उपकरण इतर खेळांच्या स्पर्धांमध्ये देखील वापरले जातात, जसे की रग्बीपासून घोड्यांच्या शर्यतीसारख्या स्पर्धांमध्येही हे उपकरण पाहिले जाते.
ड्रेसिंग रूममधील खेळाडू सामन्यात नेमकं काय चालू आहे, यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी या उपकरणाचा वापर करतात. फक्त ड्रेसिंग रूममधील खेळाडूच नाही तर सामना पाहायला आलेले प्रेक्षकही शुल्क भरून हे उपकरण घेऊ शकतात. जेव्हा सामन्यातील एखादा झेल, रनआऊट किंवा कोणतीही घटना स्पष्ट डोळ्यांनी दिसत नसेल तर या उपकरणाद्वारे नेमकं काय घडलंय हे कॉमेंट्रीद्वारे समजून घेतात. क्रीडा पत्रकार मुलाखती घेताना किंवा सामना पाहत रिपोर्ट लिहिण्यात व्यस्त असताना खेळावर लक्ष ठेवण्यासाठी या उपकरणाचा वापर करतात असे म्हटलं जात आहे.