आशिया चषक स्पर्धेत हँडशेकचा मुद्दा गाजला. या बरोबरीने पाकिस्तानचं बहिष्कारास्त्रंही. आशिया चषकाचं सूप वाजतंय तोच वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल झालादेखील. अवघ्या अडीच दिवसात भारतीय संघाने दमदार खेळ करत पहिल्या कसोटीत शानदार विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाचं ढासळणं सुरूच आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असल्यामुळे भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळतो आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट रसातळाला जात असल्याने या मालिकेला ना प्रेक्षक आहेत ना काही चर्चा. सामने एकतर्फी होत आहेत. काही वर्षांपूर्वी मात्र भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाने अचानक माघार घेत बहिष्काराचा निर्णय घेतला होता. काय झालं होतं तेव्हा नेमकं?
२०१४ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर होता. पाच वनडे सामन्यांची मालिका होती. चौथ्या वनडेदरम्यान उर्वरित दौरा रद्द झाला असल्याची बातमी आली. सुरुवातीला वेस्ट इंडिजने दौरा रद्द केला नसल्याचं म्हटलं पण नंतर त्यांनी यासंदर्भात खुलासा केला. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात मानधनाच्या मुद्यावरून मतभेद होते. हे मतभेद मिटवून सुवर्णमध्य काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण तिढा सुटला नाही. हा दौरा अर्धवट रद्द झाल्याने वेस्ट इंडिजने पर्यायी दौऱ्याचीही घोषणा केली.
नेमकं काय झालं?
१९ सप्टेंबरला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिज प्लेयर्स असोसिएशन यांच्यात करार झाला. प्लेयर्स असोसिएशनचे अध्यक्ष वेव्हेल हाइंड्स यांनी करार परिपूर्ण नसल्याचं सांगितलं मात्र सद्यस्थितीत हा करार खेळाडूंना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देईल असं सांगितलं.
७ ऑक्टोबरला वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी भारत दौऱ्यावर पहिल्या वनडेतून माघार घेण्याचा इशारा दिला. सामंजस्य करारावर स्वाक्षरी होताना हाइंड्स यांनी खेळाडूंना फसवलं असा आरोप खेळाडूंनी केला.
८ ऑक्टोबरला वेस्ट इंडिजने पहिला एकदिवसीय सामना खेळला मात्र कर्णधार ब्राव्होने हाइंड्स आणि वेस्ट इंडिज प्लेयर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टच्या मुद्यावरून तात्काळ राजीनामा द्यायला सांगितलं.
११ ऑक्टोबरला ब्राव्होने याप्रकरणी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरुन यांना तात्काळ मध्यस्थी करायची विनंती केली. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड, खेळाडू आणि खेळाडूंची संघटना यांच्यात मानधनाच्या मुद्यावरून तिढा निर्माण झाला होता.
१५ ऑक्टोबरला खेळाडू आणि संघटनेमधला वाद विकोपास गेला. हाइंड्स यांनी सगळे आरोप नाकारले. संघातल्या वरिष्ठ खेळाडूंनी याप्रकरणी मार्ग काढण्यासाठी १०० टक्के मदत करू असं हाइंड्स यांनी सांगितलं. खेळाडूंचं असं काहीही ठरलेलं नाही असं कर्णधार ब्राव्होने म्हटलं.
१६ ऑक्टोबरला या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी केवळ वेस्ट इंडिज प्लेयर्स असोसिएशनची चर्चा करू, खेळाडूंशी नाही असं वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं.
१७ ऑक्टोबरला वेस्ट इंडिजने धरमशाला इथे चौथा एकदिवसीय सामना खेळला मात्र सामनादरम्यान उर्वरित दौरा रद्द होत असल्याची बातमी समोर आली. वेस्ट इंडिजचे खेळाडू चौथा सामना खेळण्यासाठी जराही तयार नव्हते मात्र माझ्या पाठपुराव्यामुळे त्यांनी हा सामना खेळण्याचा निर्णय घेतला असं बीसीसीआयचे तत्कालीन संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.
धरमशाला इथे झालेल्या सामन्यानंतर सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीने भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली असं दाखवलं. मात्र विजेत्या संघाला म्हणजेच भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला जेतेपदाचा करंडक देण्यात आला नाही.
धरमशालाच्या एकदिवसीय सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ पाचवा सामना तसंच एकमेव टी२० सामना आणि तीन कसोटी सामने खेळणं अपेक्षित होतं.
वेस्ट इंडिजने दौऱ्यातून मध्येच माघार घेण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचं बीसीसीआयने म्हटलं. वेस्ट इंडिजचा संघ परतल्यामुळे भारतीय संघाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला विनंती केली. भारत आणि श्रीलंका यांच्यात ५ सामन्यांची मालिका झाली.
दौरा अशा पद्धतीने रद्द झाल्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची नाचक्की झाली. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवरही प्रचंड टीका झाली. वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूंनी हा चुकीचा पायंडा पडल्याचं सांगितलं.
त्या मालिकेत काय काय झालं?
कोची वनडे
वेस्ट इंडिजने मार्लन सॅम्युअल्सच्या १२६ धावांच्या खेळीच्या बळावर ३२१ धावांची मजल मारली. दिनेश रामदीनने ६१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचा डाव १९७ धावांतच आटोपला. शिखर धवनने ६८ धावा केल्या.
दिल्ली वनडे
भारतीय संघाने २६३ धावा केल्या. विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी ६२ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने नाबाद ५१ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजचा डाव २१५ धावांतच संपुष्टात आला. ड्वेन स्मिथने ९७ धावांची एकाकी झुंज दिली. मोहम्मद शमीने ४ तर रवींद्र जडेजाने ३ विकेट्स पटकावल्या.
विशाखापट्टणम वनडे
चक्रीवादळामुळे विशाखापट्टणम इथे होणारा सामना रद्द करण्यात आला.
धरमशाला वनडे
भारताने विराट कोहलीच्या १२७ धावांच्या खेळीच्या बळावर ३३० धावांचा डोंगर उभारला. अजिंक्य रहाणेने ६८ तर सुरेश रैनाने ७१ धावांची खेळी केली. मार्लन सॅम्युअल्सने मालिकेतलं दुसरं शतक झळकावलं मात्र त्याला सहकाऱ्यांची साथ मिळू शकली नाही. वेस्ट इंडिजचा डाव २७१ धावांतच आटोपला.