India W vs South Africa W: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने होते. स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांचा डोंगर उभारला होता. पण जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. दरम्यान भारतीय संघ अंतिम फेरीत कोणासोबत भिडणार आहे? हा सामना केव्हा, कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या.

या स्पर्धेतील अंतिम फेरीतील सामन्यात भारतीय संघाचा सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. त्यामुळे अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना केव्हा होणार आहे?

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ २ नोव्हेंबरला जेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी आमनेसामने येणार आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना कुठे होणार आहे?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा अंतिम सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना किती वाजता सुरू होणार आहे?

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक दुपारी २:३० वाजता होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. यासह तुम्ही जियो हॉटस्टारवर देखील लाईव्ह पाहू शकता.

ऑस्ट्रेलियाला पराभूत करून टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून लिचफील्डने दमदार शतकी खेळी केली. तर एलिस पेरीने अर्धशतकी खेळी केली. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३३८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने ८९ धावांची खेळी केली. तर शेवटी जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद शतकी खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.