१९९६चा वर्ल्डकप भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका अशा तीन देशांनी संयुक्त आयोजित केला होता. श्रीलंकेला पहिल्यांदाच आयोजनाचा मान मिळत होता. १२ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. अ गटात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, केनिया यांचा समावेश होता. ब गटात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, युएई आणि नेदरलँड्स यांचा समावेश होता.

वर्ल्डकप सुरू होण्याआधीच वादाला तोंड फुटलं होतं. सुरक्षिततेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघांनी श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. १९९६ साली तामीळ टायगर्सने राजधानी कोलंबोतील सेंट्रल बँकेत बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

आणखी वाचा: Cricket World Cup: जेव्हा लिटील मास्टर सुनील गावसकरांची वर्ल्डकपमधली खेळी ठरली होती टीकेचं लक्ष्य

१५ फेब्रुवारीला वर्ल्डकपचे सामने सुरू होणार होते. ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेत १७ फेब्रुवारी रोजी तर वेस्ट इंडिजला २५ तारखेला खेळायचं होतं. याच्या दोन आठवडे आधी ३१ जानेवारीला श्रीलंकेची राजधानी कोलंबोला बॉम्बस्फोटाने हादरवलं. या हल्ल्याला श्रीलंकेतील यादवी युद्धाची पार्श्वभूमी होती. स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने बँकेत स्फोट घडवण्यात आला. एलटीटीईने घडवून आणलेल्या या स्फोटात ९१ जणांचा मृत्यू झाला तर १४०० हून अधिक जण जखमी झाले. स्फोटानंतर दहशतवादी आणि सुरक्षायंत्रणांमध्ये गोळीबारही झाला. हे सगळं नुकतंच घडून गेलेलं असल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघांना श्रीलंकेत खेळण्याबाबत साशंकता वाटली.

आणखी वाचा: Cricket World Cup: पाऊस जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हिरावतो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज बोर्डाशी चर्चा केली. पण ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघ श्रीलंकेत न जाण्यावर ठाम राहिले. दोन्ही संघांनी श्रीलंकेत जाण्याला नकार दिल्याने श्रीलंकेला दोन्ही सामन्यांचे गुण देण्यात आले. यामुळे एकही सामना न खेळता श्रीलंकेचा उपउपांत्य फेरीत पोहोचला. गटवार लढतीत श्रीलंकेला पाच सामने खेळायचे होते. यापैकी दोन सामन्यांचे गुण त्यांना बहाल करण्यात आले. झिम्बाब्वे, केनिया आणि तुल्यबळ भारताला नमवत श्रीलंकेच्या संघाने एकही सामना न गमावता दमदार आगेकूच केली. झिम्बाब्वे आणि केनिया या दोन संघांचे श्रीलंकेतील सामने सुरळीतपणे पार पडले. आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांना श्रीलंकेत न खेळल्याबद्दल मोठा दंडही ठोठावला होता.

योगायोग म्हणजे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. पण लाहोर इथे झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम मुकाबल्यात श्रीलंकेसमोर ऑस्ट्रेलियाचंच आव्हान होतं. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत श्रीलंकेने विश्वविजेतेपदावर कब्जा केला.