India vs Pakistan Asia Cup 2025 Final: आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने करंडक स्वीकारण्यावरून नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार दिला. पुरस्कार वितरण सोहळ्यातही भारतीय संघ करंडक स्वीकारणार नाही असं सांगण्यात आलं. जेतेपदं आणि पदकं घेऊन नक्वी रवाना झाल्याचंही वृत्त आहे. जेतेपद आणि वाद यासंदर्भात इतिहासातल्या एका घटनेची आठवण होणं साहजिक आहे.

२००६ मध्ये भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दमदार फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात जेतेपदावर नाव कोरलं. पुरस्कार वितरण सोहळ्यात जेतेपदाचा करंडक स्वीकारताना मात्र गालबोट लागलं. ऑस्ट्रेलियाचा संघ आणि वादविवाद हे समीकरण नवीन नाही. सातत्याने चांगला खेळ करत सर्व प्रकारात वर्चस्व गाजवणारा संघ अशी त्या काळातल्या ऑस्ट्रेलिया संघाची ओळख होती.

अंतिम लढत जिंकल्यानंतर काही मिनिटांतच पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. बीसीसीआयचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनी जेतेपदाचा करंडक पॉन्टिंगकडे सुपुर्द करणं अपेक्षित होतं. जेतेपदाच्या करंडकासह सेलिब्रेशनसाठी आतूर झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने शरद पवार यांना धक्का देत करंडक जवळपास हिसकावून घेतला.

पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान पॉन्टिंगने पवार यांना उद्देशून आम्हाला झटपट करंडक द्या असं सूचित केलं. बाकी पुरस्कारांचं वितरण झाल्यानंतर लगेचच पवारांनी पॉन्टिंगकडे जेतेपदाचा करंडक सोपवला. जेतेपदासह फोटोसेशन आणि सेलिब्रेशन करण्यासाठी उतावीळ ऑस्ट्रेलियाच्या संघाने पवारांना धक्का दिला. मधल्या फळीतील फलंदाज डेमियन मार्टिनने पवारांना व्यासपीठावरून बाजूला केलं.

असंख्य वनडे वर्ल्डकप नावावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. दरम्यान पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखवत या प्रकरणाचा बाऊ केला नाही. ही छोटी गोष्ट आहे असं सांगत पवार यांनी वाद वाढवला नाही. क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाच्या या उर्मट वागण्याचे पडसाद उमटले. भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघावर टीका केली. त्यावेळी दिलीप वेंगसरकर हे निवडसमितीचे अध्यक्ष होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघावर कडाडून टीका केली. ‘हे असं वागणं निरक्षर लोकांना शोभतं. ऑस्ट्रेलियाच्या संघाला जेतेपदाच्या करंडकासह फोटोंची एवढी घाई झाली होती तर त्यांना पवारांना विनंती करून सांगता आलं असतं. हे वर्तन अश्लाघ्य आहे’, असं वेंगसरकर म्हणाले.

डेमियन मार्टिन पवारांना धक्का देऊन बाजूला करत असल्याचा फोटो सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये झळकला. पवार यांनी काही काळानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर टीका केली पण क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय यांच्यातले सौहार्दपूर्ण संबंध लक्षात घेऊन त्यांनी हे प्रकरण वाढवलं नाही.

अंतिम लढतीत काय झालं?

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी लढतीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा डाव १३८ धावांतच आटोपला. ख्रिस गेलने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन ब्रॅकनने ३ तर ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात १३/२ अशी झाली होती पण शेन वॉटसन (नाबाद ५७) आणि डेमियन मार्टिन (नाबाद ४७) यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अर्धशतकी खेळी आणि २ विकेट्स याकरता वॉटसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. स्पर्धेत ४७४ धावा आणि ८ विकेट्स पटकवणाऱ्या ख्रिस गेलला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत एकही लढत न गमावता जेतेपदावर नाव कोरलं.