Who Is Anshul Kamboj: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातही इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात ३ मोठे बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान अंशुल कंबोज आहे तरी कोण? जाणून घ्या.
या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आकाशदीप गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी देखील दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला पदार्पण करण्याची संधी मिळणार होती. पण, त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे अंशुल कंबोजला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
कोण आहे अंशुल कंबोज?
अंशुल कंबोजने १५ नोव्हेंबर २०२४ रोजी हरयाणाकडून खेळताना एका डावात १० पैकी १० गडी बाद बाद करत नवा विक्रम रचला होता. केरळ संघाविरुद्ध रोहतक येथे पार पडलेल्या लढतीत अंशुलने शॉन रॉजरला बाद करत डावातील सगळ्या विकेट्स पटकावण्याचा मान मिळवला होता. रणजी करंडक स्पर्धेत एका डावात १० विकेट्स घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला होता. १९५६-५७ मध्ये प्रेमांग्सू चॅटर्जी यांनी तर प्रदीप सुदरमन यांनी १९८५-८६ मध्ये १० विकेट्स घेण्याची करामत केली होती. त्याला २०२२ मध्ये हरयाणाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. २०२३-२४ हंगामात विजय हजारे स्पर्धेत अंशुल हरयाणासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी होता.
अंशुलला आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या संघाकडून त्याला २ सामने खेळण्याची संधी मिळाली. अंशुलने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केलं होतं. ग्लेन मॅकग्रा हा अंशुलचा आदर्श आहे. हरयाणातलं करनाल हे अंशुलचं गाव. बॉक्सिंगपटूंसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. १४व्या वर्षी त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अंशुलला आता भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.
हरयाणाकडून कसोटी पदार्पण करणारे खेळाडू
अंशुल कंबोज हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरयाणाकडून खेळतो. आता त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिव देव यांना देखील या हरयाणाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. यासह चेतन शर्मा, अजय जडेजा, विजय यादव, अजय रात्रा, योगराज सिंग, अशोक मल्होत्रा, अमित मिश्रा यांना देखील हरयाणाकडून खेळताना भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.