Mumbai Businessman Ravi Ghai Net Worth: सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा आहे. अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा सानिया चंडोक हिच्याबरोबर झाल्याचे म्हटले जात आहे. सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. उद्योजक रवी घई यांचा बिझनेस आणि त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन आणि सानिया चंडोक हिचा साखरपुडा झाल्याची चर्चा १३ ऑगस्ट रोजी रात्रीपासून सुरू झाली आहे. पण तेंडुलकर किंवा घई कुटुंबियांपैकी कोणीच याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. तर या दोघांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाल्यापासून सारा-अर्जुन यांच्याबरोबरचा सानिया चंडोकचा फोटो व्हायरल होत आहे.
कोण आहेत रवी घई?
रवी घई हे मुंबईच्या व्यवसाय आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील एक प्रमुख नाव आहेत. रवी घई हे ग्रॅव्हिस ग्रुपचे प्रमुख आहेत. फूड आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात या समूहाने अनेक यशस्वी उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांच्या कुशाग्र व्यावसायिक कौशल्यासाठी ओळखले जाणारे रवी घई हे मरीन ड्राइव्ह येथील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड, द ब्रुकलिन क्रीमरी सारख्या प्रतिष्ठित ब्रँड आणि मालमत्तांचे मालक आहेत.
रवी घई यांनी कॉर्नेल विद्यापीठाच्या प्रतिष्ठित स्कूल ऑफ हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून शिक्षण घेतलं आहे. १९६७ मध्ये ते मुंबईत परतले आणि त्यांचे वडील इक्बाल कृष्णन (IK Ghai) घई यांच्याकडून व्यवसायाचा वारसा घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली, ग्रॅव्हिस ग्रुपने क्वालिटी आईस्क्रीम आणि नटराज हॉटेल (आता इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल म्हणून ओळखले जाणारे) सारखे प्रसिद्ध ब्रँड लाँच केले.
घई यांनी सार्क प्रदेशांमध्ये बास्किन-रॉबिन्स फ्रँचायझी आणली, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायात आणखी वैविध्य आले. सध्या ते ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम पाहतात आणि क्वालिटी रीड इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि परफेक्ट लाईव्हस्टॉक एलएलपीसह अनेक कंपन्यांमध्ये संचालक पदांवर आहेत. गेल्या काही दशकांमध्ये, त्यांनी हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीमध्ये एक प्रभावी स्थान निर्माण केलं आहे.

मुलगा गौरव घईसह कौटुंबिक कलह
व्यावसायिक क्षेत्रात प्रचंड यश मिळवूनही रवी घई यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेचसे चढउतार आले आहेत. फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, रवी यांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी आपल्या मुलगा, गौरव घई याच्यावर बनावट कागदपत्र तयार करणं, फसवणूक करणं आणि संमतीशिवाय कंपनीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणं असे आरोप केले होते.
रवी घई यांचा मुलगा गौरवने फसवणूक केल्याचा गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?
रवी घई यांनी असाही आरोप केला की, ते कॅन्सरसाठीचे उपचार घेत असताना त्यांच्या मुलाने त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यांनी पुढे सांगितलं की २००१ मध्ये व्यवसायाची पुनर्रचना होण्यापूर्वी ते ग्रॅव्हिस ग्रुपचे १०० टक्के पूर्णपणे मालक होते.
रवी घई परदेशातून कर्करोगाचा उपचार करून परतल्यानंतर, त्यांचा मुलगा आणि सून अनेकदा त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी व्यवसायाची कागदपत्रे घेऊन येत असत. तब्येत नाजूक असल्याने त्यांनी संशय न घेता त्या कागदपत्रांवर सही केली. रवी यांनी असा आरोप केला की, जानेवारी २०२५ पासून त्यांना मिळणारा दरमहा १२.५ लाख रुपयांचा भत्ता थांबवण्यात आला आणि एप्रिल महिन्यात मुख्य वित्त अधिकारी (CFO) कडून त्यांना समजलं की गौरवने स्वतःला कंपनीचा चेअरमन घोषित करून संपूर्ण ताबा घेतला आहे.
रवी घई यांनी केलेले आरोप गंभीर असले तरीही पोलिसांनी मात्र एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. पोलिसांच्या मते हा वाद कौटुंबिक प्रकार असून तो फौजदारी प्रक्रियेऐवजी मध्यस्थीद्वारे सोडवणं अधिक योग्य ठरेल. पण हा वाद अद्याप काही सुटलेला नाही.