Sana Mir Controversial Comment During Women’s World Cup 2025: भारतात आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पण पाकिस्तानचे सामने श्रीलंकेतील कोलंबोत खेळवले जात आहेत. या स्पर्धेत गुरुवारी (२ ऑक्टोबर) बांगलादेश विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगला. या सामन्यात पाकिस्तानला बांगलादेशकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात तसं फार काही घडलं नाही. पण या सामन्यात समालोचन करत असलेली पाकिस्तानची माजी कर्णधार सना मी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. दरम्यान सना मीर आहे तरी कोण? समालोचन करत असताना ती नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या.
नेमकं काय घडलं?
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील गुरूवारी झालेल्या सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने होते. हा सामना कोलंबोत पार पडला. या सामन्यात पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीर समालोचन करत होती. समालोचन करत असताना तिने क्रिकेटच्या व्यासपीठावर राजकीय अजेंडा पुढे रेटल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर झाले असे की, पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना, २९ व्या षटकात नतालिया परवेज फलंदाजीला आली. एखादा फलंदाज बाद होऊन माघारी परतल्यानंतर जेव्हा नवीन फलंदाज फलंदाजीला येतो, त्यावेळी समालोचक त्या फलंदाजाची ओळख करून देतात.
नतालिया परवेज फलंदाजीला आली, त्यावेळी सना मीरने काश्मीरचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं. नतालिया परवेजबद्दल बोलताना ती म्हणाली की, नतालिया ही काश्मीरची रहिवाशी आहे. पण लगेचच तिने मुद्दाम नतालिया ही स्वतंत्र काश्मीरची रहिवाशी असल्याचं सांगितलं. क्रिकेट खेळण्यासाठी तिला लाहोरमध्ये यावे लागते, असं देखील ती म्हणाली. हे वक्तव्य केल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तसेच आयसीसीने तिच्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी केली जाऊ लागली आहे.
कोण आहे सना मीर?
सना मीर ही पाकिस्तानच्या महिला संघाची माजी कर्णधार आहे. ३९ वर्षीय सनाचा जन्म ५ जानेवारी १९८६ ला पाकिस्तानातील ऐबटाबादमध्ये झाला. २००५ मध्ये तिला पाकिस्तान संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. तिला १२० वनडे क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यादरम्यान तिने २४.२७ च्या सरासरीने १५१ गडी बाद केले. तर टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना तिने १०६ सामन्यांमध्ये तिने २३.४२ च्या सरासरीने ८९ गडी बाद केले. तर फलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर तिने १७.९१ च्या सरासरीने १६३० धावा केल्या. तर टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना तिने १४.०७ च्या सरासरीने ८०२ धावा केल्या. तिला ७२ सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यादरम्यान पाकिस्तानने २६ सामने जिंकले, तर ४५ सामने गमावले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व करताना तिने ६५ पैकी २६ सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवून दिला. तर ३६ सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ती समालोचकाची भूमिका पार पाडत आहे.