ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल हे खेळाडू तर चर्चेत आहेत. पण यांच्याशिवाय अजून एक चर्चेतील नाव म्हणजे हर्षित राणा. रोहित शर्माच्या जागी शुबमन गिलकडे कर्णधारपदाची सूत्र सोपवण्यात आली. यादरम्यान गिलच्या नेतृत्त्वाखाली वनडे आणि टी-२० दोन्ही मालिकांसाठी हर्षित राणाची निवड करण्यात आली आहे. हर्षित राणाच्या संघातील निवडीमुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केलं जात आहे.
४ ऑक्टोबरला निवडसमितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-२० संघांची घोषणा केली, तेव्हा गिलसह ७ खेळाडू दोन्ही संघांचा भाग होते. हर्षित राणा हा त्यापैकी एक आहे, परंतु इतर सहा जणांची निवड निर्विवाद असली तरी, हर्षित राणाला मात्र चाहत्यांनी लक्ष्य केलं आहे. दिल्लीचा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज गौतम गंभीरचा लाडका असल्याने त्याला संघात संधी दिल्याची चर्चा केली जात आहे.
सध्या टीम इंडियामध्ये असा कोणताही वरिष्ठ खेळाडू नाही, ज्याच्याबरोबर हर्षित राणा गेला खूप काळ क्रिकेट खेळला असेल. पण संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कोलकाताचे मेन्टॉर असताना त्याने हर्षितची कामगिरी जवळून पाहिली आहे. जिथे गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकात्याला आयपीएल २०२४ चे विजेतेपद जिंकून देण्यात राणाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतरच गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक बनला आणि काही महिन्यांनंतर हर्षितने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केलं.
हर्षितचं तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी
नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान राणाने कसोटीत पदार्पण केलं. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये त्याने टी२० सामन्यात पदार्पण केलं आणि एका आठवड्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. या तिन्ही फॉरमॅटमधील त्याची कामगिरी सर्वसाधारण राहिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्येही मोहम्मद सिराजच्या जागी हर्षित राणाची निवड केली होती. यादरम्यान त्याला पाकिस्तानविरूद्ध हायव्होल्टेज सामन्यात १ विकेट घेत ३० धावा दिल्या होत्या.
तर आशिया चषक २०२५ मध्येही हर्षित राणा संघाचा भाग होता आणि यातही प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. हर्षितने आतापर्यंत २ कसोटी सामन्यांत ४ विकेट्स, ३ टी-२० सामन्यांमध्ये १०च्या इकॉनॉमीसह ५ विकेट्स, तर ५ वनडे सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या आहेत.
हर्षित राणा का होतोय ट्रोल?
हर्षितची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या निवडीबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गौतम गंभीरवर केकेआरवरील प्रेमामुळे हर्षितला वारंवार संधी दिल्याचा आरोप होत आहे. माजी भारतीय कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनीही उपहासात्मकपणे म्हटलं की गिलनंतर जर अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणाचे स्थान निश्चित झालं असेल तर ते हर्षित राणा आहे आणि याचे कारण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आहे.
हर्षित राणाच्या ट्रोलिंगवर आकाश चोप्राचं वक्तव्य
हर्षित राणाला प्रचंड ट्रोल केलेलं पाहून माजी खेळाडू आकाश चोप्रा त्याच्या समर्थनार्थ उतरला आहे. आकाश चोप्रा म्हणाला, “मला वाटतं राणामध्ये खूप क्षमता आहे. तो फलंदाजी करू शकतो आणि त्याची गोलंदाजीची प्रतिभा स्पष्टपणे दिसून येते.” केकेआरने त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवल्यामुळे हर्षितच्या पदार्पणाला विलंब झाला, असेही तो म्हणाला.
“भारतासाठी खेळणाऱ्या कोणालाही ट्रोल करणं थांबवा. तो प्रतिभावान आहे आणि त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये चांगली गोलंदाजी केली. मी म्हणेन की त्याला वेळ द्या,” असं आकाश चोप्रा पुढे म्हणाला.
हर्षित राणाच्या ट्रोलिंगवर काय म्हणाला अश्विन?
आर अश्विनने देखील हर्षित राणाच्या निवडीवर वक्तव्य केलं आहे. अश्विन म्हणाला, “माझ्या मते त्याच्या निवडीबाबत बऱ्याचशा गोष्टी त्याच्या बाजूने आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पिचवर तुम्हाला असा वेगवान गोलंदाज हवा असतो जो फलंदाजीही करू शकेल. आता तुम्ही विचाराल की, तो खरंच फलंदाजी करू शकतो का, तर टीम इंडियामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना वाटतं की तो फलंदाजी करू शकतो, म्हणूनच त्याला आठव्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. आणि जर तुम्ही मला विचाराल की त्याच्या गोलंदाजीत क्षमता आहे का,
तर माझं उत्तर असेल, हो, नक्कीच आहे. हर्षित राणामध्ये टॅलेंट नाही, असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे.”
हर्षितबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोलंदाजीबरोबरच तो खालच्या फळीत फलंदाजीतही योगदान देऊ शकतो, जे कोणत्याही स्पर्धेत महत्त्वाचं ठरू शकतं. पण हर्षितची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची उंची, वेगवान गोलंदाजी आणि उसळी घेण्याची क्षमता. पण हे सर्व द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेसाठी केले जात नाहीये तर दोन वर्षांत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत त्याला तयार केलं जात आहे, जेणेकरून दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर कायमच उंच असलेल्या गोलंदाजांना झालेला फायदा भारतीय संघालादेखील हर्षितच्या माध्यमाने होईल.