Washington Sundar: दक्षिण आफ्रिकेला जे गेल्या २७ वर्षांत जमलं नव्हतं, तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने करून दाखवलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना, समोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान. अंतिम सामन्यात प्रवेश करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ ट्रॉफी उंचावल्याशिवाय माघार घेत नाही, हा गेल्या काही वर्षांतील रेकॉर्ड सांगतो. पण यावेळी दक्षिण आफ्रिकेने इतिहास बदलला. ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी उंचावली. हा विजय मिळवण्यात दक्षिण आफ्रिकेच्या सर्व ११ खेळाडूंना मोलाची भूमिका बजावली. पण यात विशेष योगदान दिलं, ते वियान मुल्डरने. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, मुल्डरने असं काय केलं? मुल्डरने जे काही केलं, त्यातून इतर संघांनी आदर्श घ्यायला हवा.
फलंदाजीक्रमात बदल
वियान मुल्डर हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. वियान मुल्डरने वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवलं. म्हणून आठव्या क्रमांकाला फलंदाजीला येणारा गोलंदाज अशी त्याची ओळख. पण, त्याचं फलंदाजीतील कौशल्य पाहून त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. पहिल्या सामन्यात त्याने ४४ चेंडू खेळून काढले आणि ६ धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याने केलेली खेळी अतिशय महत्वाची ठरली.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर मुल्डर फलंदाजीला आला आणि ५० चेंडूंचा सामना करत त्याने २७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने एडेन मारक्रमसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली. यासह गोलंदाजी करताना त्याने १ गडी बाद केला. झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने १४७ धावांची खेळी केली. तर गोलंदाजी करताना त्याने ४ गडी बाद केले.
वियान मुल्डरचा उल्लेख करण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, भारतीय संघात असा प्रयोग का केला जात नाही? गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. पण,पुजारा संघाबाहेर झाल्यानंतर भारतीय संघाला असा फलंदाज मिळालेला नाही जो या क्रमांकावर टीकून फलंदाजी करेल. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात करूण नायरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं.
वॉशिंग्टन सुंदर का नाही?
जर दक्षिण आफ्रिकेचा संघ असा प्रयोग करून पाहू शकतो, तर भारतीय संघ का नाही? भारतीय संघाची खालची फळी खूप मोठी आहे. वॉशिंग्टन सुंदर आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान दिलं जातं. पण, त्याचा रेकॉर्ड पाहिला, तर तो प्रमुख फलंदाज म्हणून देखील खेळू शकतो. त्याला जर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं तर तो एक बाजू धरून ठेवू शकतो. डावखुरा फलंदाज असणं ही भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे. हा प्लॅन जर यशस्वी ठरला. तर वॉशिंग्टन सुंदर, भारतीय संघासाठी मुल्डर बनू शकतो.
मुल्डर विरुद्ध वॉशिंग्टन सुंदर कसा आहे रेकॉर्ड?
वियान मुल्डरचा रेकॉर्ड पाहिला, तर त्याने २० कसोटी सामन्यांमध्ये ७८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान २ शतकं आणि १ अर्धशतक झळकावलं आहे. १४७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ८७ सामन्यांमध्ये ४५४० धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावे २०७२ धावा करण्याची नोंद आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या नावे ९ कसोटी सामन्यांमध्ये ४६८ धावा करण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने ४ अर्धशतकं झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३६ सामन्यांमध्ये त्याने १६०१ धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ७८ सामन्यांमध्ये त्याने ९९७ धावा केल्या आहेत.