Team India Victory Celebration After Historic Win: भारतीय महिला संघाने गेल्या कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपवत पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवला. हा विजय भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास आहे. कारण बऱ्याचदा भारतीय संघ या ट्रॉफीच्या जवळ पोहोचला होता, पण ट्रॉफी उंचावू शकला नव्हता. मात्र यावेळी भारतीय खेळाडूंनी पूर्ण जोर लावला आणि शेवटी जेतेपदाचा मान पटकावला. पहिल्यादांच जेतेपद पटकावल्यानंतर विजयाचा जल्लोष तर जोरदार झाला. पण विजयी मिरवणूक निघणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबत मोठी अपडेट दिली आहे.
भारतीय महिला संघाची विजयी मिरवणूक निघणार का?
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि अधिकारी आयसीसीच्या बैठकीसाठी दुबईला रवाना झाले आहेत. दुबईला रवाना होण्यापूर्वी त्यांनी विजयी मिरवणूक होणार की नाही, याबाबत मोठी अपडेट दिली.
वृत्तसंस्था IANS शी बोलताना सांगितले की, “सध्या तरी विजयी मिरवणूक काढण्याचा प्लान आम्ही तयार केलेला नाही. मी दुबईला आयसीसीच्या बैठकीसाठी निघालो आहे आणि बाकीचे अधिकारीही तिथे जाणार आहेत. परत आल्यानंतरच जल्लोष कसा साजरा करायचा याबाबत योजना आखली जाईल.” याआधी भारताने २०२४ मध्ये टी – २० वर्ल्डकप स्पर्धा जिंकली होती त्यावेळी मुंबईत जंगी मिरवणूक काढण्यात होती. पण त्यानंतर आयपीएल फायनल झाल्यानंतर खूप गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती. त्यामुळे बीसीसीआय घाई करणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
आशिया चषकाची ट्रॉफी भारतात येणार?
भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करत जेतेपदाचा मान पटकावला होता. पण अंतिम सामना जिंकूनही भारतीय संघाला ट्रॉफी दिली गेली नव्हती. भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले होते. आता बीसीसीआय आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. आशिया चषकाची ट्रॉफी आदरपूर्वक भारतात आणण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचं देवजीत सैकिया म्हणाले.
भारताचा ऐतिहासिक विजय
या स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शफाली वर्माने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर दिप्ती शर्माने देखील अर्धशतक झळकावलं. भारताने पहिल्या डावात २९८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २९९ धावा करायच्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारताने ५२ धावांनी विजय मिळवला.
