लंडन: फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती इगा श्वीऑनटेक आणि उपविजेती कोको गॉफचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. पुरुषांच्या गटात टेलर फ्रिट्झ, अ‍ॅलेक्स डी मिनाऊर यांनी आगेकूच केली, तर महिला एकेरीत सिमोना हालेप, अमँडा अनिसिमोव्हा, एलिझे कॉर्नेट यांनी विजय नोंदवले.महिलांमध्ये पोलंडच्या अग्रमानांकित श्वीऑनटेकने फ्रान्सच्या बिगरमानांकित कॉर्नेटकडून ४-६, २-६ असा पराभव पत्करला. श्वीऑनटेकची जेतेपदासाठी  प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र कॉर्नेटने सलग ३७ सामन्यांची तिची विजयमालिका खंडित केली. अमेरिकेच्या २०व्या मानांकित अनिसिमोव्हाने पिछाडीवरून पुनरागमन करत गॉफला ६-७ (४-७), ६-२, ६-१ असे नमवत आणखी एका आश्चर्यकारक निकालाची नोंद केली. रोमानियाच्या विम्बल्डन गतविजेत्या हालेपने पोलंडच्या मॅग्दालेना फ्रेचवर ६-४, ६-१ असा सरळ सेटमध्ये विजय साकारला, तर फ्रान्सच्या हार्मनी टॅनने ब्रिटनच्या कॅटी बाऊल्टरला ६-१, ६-१ असे सहज पराभूत केले. क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिचने आठव्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलावर ६-२, ७-६ (७-५) असा विजय साकारला.

पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या फ्रिट्झने स्लोव्हाकियाच्या अ‍ॅलेक्स मोल्कानवर ६-४, ६-१, ७-६ (७-३) असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या मिनाऊरने ब्रिटनच्या लिआम ब्रॉडीला ६-३, ६-४, ७-५ असे हरवून पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमाने कोलंबियाच्या डॅनिएल गलानवर ६-४, ६-४, ६-१ अशी मात केली, तर ऑस्ट्रेलियाच्या बिगरमानांकित जेसन कुबलेरने चुरशीच्या लढतीत अमेरिकेच्या जॅक सॉकचे ६-२, ४-६, ५-७, ७-६ (७-४), ६-३ असे नामोहरम केले.