लंडन : अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने शुक्रवारी ब्रिटनच्या कॅमेरून नॉरीवर पिछाडीवरून सरशी साधत सलग चौथ्यांदा आणि एकूण आठव्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या फेरीत त्याच्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचे आव्हान असेल.

सलग चौथ्या विम्बल्डन आणि एकूण २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शोधात असलेल्या जोकोव्हिचने उपांत्य फेरीत नवव्या मानांकित नॉरीला २-६, ६-३, ६-२, ६-४ असे पराभूत केले. सुरुवातीचे सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करण्यासाठी जोकोव्हिच ओळखला जातो. हेच शुक्रवारच्या सामन्यातही पाहायला मिळाले. प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणाऱ्या नॉरीने आक्रमक खेळ करताना पहिला सेट ६-२ अशा फरकाने जिंकला. त्याने या सेटमध्ये दोन वेळा जोकोव्हिचची सव्‍‌र्हिस तोडली.

यानंतर मात्र जोकोव्हिचने आपला खेळ उंचावत अपेक्षित पुनरागमन केले. त्याने आपल्या आक्रमणाची गती वाढवल्यानंतर २६ वर्षीय नॉरीने चुका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जोकोव्हिचने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये अनुक्रमे ६-३ आणि ६-२ अशी बाजी मारत सामन्यात आघाडी मिळवली. चौथ्या सेटमध्ये नॉरीने जोकोव्हिचला चांगली झुंज दिली. मात्र, जोकोव्हिचने एकदा नॉरीची सव्‍‌र्हिस मोडली आणि आपली सव्‍‌र्हिस राखत हा सेट ६-४ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

जाबेऊर-रायबाकिना पहिल्या जेतेपदासाठी उत्सुक

लंडन : विम्बल्डन टेनिस स्पर्धेला शनिवारी नवविजेती मिळणार असून महिला एकेरीच्या अंतिम लढतीत टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर आणि कझाकस्तानची एलिना रायबाकिना आमनेसामने येणार आहेत. तिसऱ्या मानांकित जाबेऊरने अपेक्षित कामगिरी करताना प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, १७व्या मानांकित रायबाकिनने उपांत्य फेरीत माजी विजेत्या सिमोना हालेपसारख्या खेळाडूवर सरशी साधत अनपेक्षितपणे अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता जाबेऊर आणि रायबाकिना या दोघींचाही कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न आहे. शनिवारी ‘सेंटर कोर्ट’वर रंगणाऱ्या अंतिम सामन्यात जाबेऊरचे पारडे जड मानले जात आहे. तिने उपांत्य फेरीत जर्मनीच्या मारियावर विजय मिळवला होता. मात्र रायबाकिनामध्येही धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होऊ शकेल.

’ वेळ : सायं. ६.३० वा.; ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, सिलेक्ट १

जायबंदी नदालची माघार

लंडन : स्पेनचा तारांकित टेनिसपटू राफेल नदालला स्नायूंच्या दुखापतीमुळे विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यातून माघार घेणे भाग पडले. शुक्रवारी त्याचा ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसशी सामना रंगणार होता. मात्र, गुरुवारी रात्री उशिराने त्याने या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती दिली. ‘‘माझी सध्याची स्थिती पाहता मी दोन सामने (उपांत्य आणि अंतिम) जिंकणे शक्य नाही. त्यामुळे मी उपांत्य फेरीतील सामन्यातून माघार घेण्याचे ठरवले आहे. मला सव्‍‌र्हिस करताना त्रास जाणवत आहे. मी योग्य गतीने सव्‍‌र्हिस करू शकत नाही आणि सव्‍‌र्हिसदरम्यान मला हालचाल करतानाही अडचण येत आहे,’’ असे २२ ग्रँडस्लॅम विजेता नदाल म्हणाला. दुसऱ्या मानांकित नदालला टेलर फ्रिट्झविरुद्धच्या उपांत्य सामन्यादरम्यान दुखापत झाली. १९३१पासून विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य किंवा अंतिम सामन्यातून पुरुष खेळाडूने माघार घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. दुखापतीमुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याचे दु:ख होत असल्याचे नदालने सांगितले. नदालने माघार घेतल्यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी किरियॉसला अंतिम फेरीत पुढे चाल मिळाली. जागतिक क्रमवारीत ४०व्या स्थानी असलेला किरियॉस कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळेल.

३२ जोकोव्हिचने ३२व्यांदा  ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे पुरुष टेनिसपटूचा सर्वाधिक ग्रँडस्लॅम अंतिम सामन्यांचा विक्रम जोकोव्हिचने आपल्या नावे केला. स्वित्र्झलडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर ३१ ग्रँडस्लॅम अंतिम सामन्यांत खेळला आहे.