वृत्तसंस्था, विम्बल्डन : Wimbledon Tennis Championships ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफनोस त्सित्सिपासने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत माजी विजेत्या ब्रिटनच्या अँडी मरेचे आव्हान दुसऱ्या फेरीतील चुरशीच्या लढतीत संपुष्टात आणले. स्पेनच्या अग्रमानांकित कार्लोस अल्कराझने आपली लय कायम पुढची फेरी गाठली. 

त्सित्सिपासने मरेला पाच सेट रंगलेल्या लढतीत ७-६ (७-३), ६-७ (२-७), ४-६, ७-६ (७-३), ६-४ असे पराभूत केले. सामन्यातील पहिला सेट त्सित्सिपासने जिंकत चांगली सुरुवात केली. यानंतरचे दोन्ही सेट मरेने जिंकत आघाडी घेतली. मात्र, अखेरच्या दोन सेटमध्ये खेळ उंचावत त्सित्सिपासने विजय नोंदवला. अल्कराझने आपली विजयी लय कायम राखताना फ्रान्सच्या अ‍ॅलेक्झांडर मुलरला ६-४, ७-६ (७-२), ६-३ असे पराभूत केले. त्याचप्रमाणे तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव, डेन्मार्कचा सहावा मानांकित होल्गर रून आणि इटलीचा माटेओ बेरेट्टिनी यांनीही तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले.

तर, पोलंडच्या हबर्ट हुरकाझला तिसऱ्या फेरीतील सामना जिंकण्यातही यश आले. मेदवेदेवने फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मानारिनोला ६-३, ६-३, ७-६ (७-५) असे पराभूत केले. रूनने स्पेनच्या रोबेटरे कारबालेस बाएनावर ६-३, ७-६ (७-३), ६-४ असा विजय नोंदवत पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. तर हुरकाझने इटलीच्या लॉरेंझो मुसेट्टीला ७-६ (७-४), ६-४, ६-४ असे नमवले. सामन्यातील पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर हुरकाझने पुढील दोन सेटमध्ये मुसेट्टीला पुनरागमनाची संधी दिली नाही. अन्य सामन्यात बेरेट्टिनीने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनाऊरवर ६-३, ६-४, ६-४ असा विजय साकारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सबालेन्का विजयी

महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का आणि तिसऱ्या मानांकित कझाकस्तानच्या एलिना रायबाकिनाने आपली आगेकूच कायम राखली. सबालेन्काने फ्रान्सच्या वरवरा ग्राचेव्हावर २-६, ७-५, ६-२ असा विजय साकारत तिसरी फेरी गाठली. पहिला सेट गमावल्यानंतर सबालेन्काने पुढच्या दोन सेटमध्ये खेळ उंचावत आगेकूच केली. गतविजेत्या रायबाकिनाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने फ्रान्सच्या अलाइझ कॉर्नेटला ६-२, ७-६ (७-२) असे पराभूत केले. चौथ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने स्पेनच्या ख्रिस्तिना बुक्सावर ६-१, ६-४ असा सहज विजय नोंदवला.