वृत्तसंस्था, लंडन : ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन आणि मॅक्स पर्सेल या जोडीने धक्कादायक विजयाची नोंद करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटाचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात १४व्या मानांकित एब्डेन-पर्सेल जोडीने दुसऱ्या मानांकित क्रोएशियाच्या निकोला मेक्टिच आणि मेट पाव्हिच जोडीवर ७-६ (७-५), ६-७ (३-७), ४-६, ६-४, ७-६ (१०-२) अशी पाच सेटमध्ये मात केली. तब्बल चार तास आणि ११ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात दोन्ही जोडय़ांनी उत्कृष्ट खेळ केला. एब्डेन-पर्सेल जोडीने पहिला सेट जिंकल्यानंतर मेक्टिच-पाव्हिच जोडीने दमदार पुनरागमन करताना पुढील दोन सेटमध्ये सरशी साधली. मात्र, चौथ्या सेटमध्ये पुन्हा एब्डेन-पर्सेल जोडीला विजय मिळवण्यात यश आले. त्यानंतर पाचव्या सेटमध्येही दोन्ही जोडय़ांमध्ये जेतेपद पटकावण्याची जिद्द दिसली. या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाल्याने विजेती जोडी ठरवण्यासाठी टायब्रेकर झाला. यात एब्डेन-पर्सेल जोडीने १०-२ अशी बाजी मारली.
एब्डेन आणि पर्सेल या दोघांच्याही कारकीर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. तसेच विम्बल्डनमधील पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवणारी ही २२ वर्षांतील पहिली ऑस्ट्रेलियन जोडी ठरली.
भारताची ऐश्वर्या पराभूत
भारताच्या ऐश्वर्या जाधवला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कुमारी (१४ वर्षांखालील) गटातील पाच पैकी चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. कोल्हापूरच्या ऐश्वर्याला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यानंतर तिने दुसऱ्या फेरीतील सामना गमावला. मग रोमेनियाची आंद्रेया सोरे (६-३, ६-२), ब्रिटनशी मिका स्टोयसाव्हलेव्हिच (६-४, ६-१) आणि न्यूझीलंडची ऐशी दास (६-३, २-६, १०-५) यांच्याकडून ऐश्वर्याने सलग तीन साखळी सामन्यांत हार पत्करली. त्यामुळे तिला उपांत्य फेरी गाठता आली नाही.