मूळ किंमत कमी करण्याच्या मुद्यावरून नाराजीचे बंड जोरात असताना स्पर्धा आकर्षक करण्याच्या दृष्टीने आयबीएल व्यवस्थापनाकडून राबवण्यात येणाऱ्या गुणांकन पद्धतीमुळे स्पध्रेतील चुरस अधिक वाढणार आहे. एखाद्या संघाने दुसऱ्या संघाविरुद्धची लढत गमावली तरी सर्वोत्तम पाच सामन्यांमधील प्रत्येक विजयाचे गुण त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
पहिलीवहिली आयबीएल स्पर्धा १४ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत रंगणार असून, एकूण ९० सामने होणार आहेत. जेतेपदासाठी दिल्ली स्मॅशर्स, हैदराबाद हॉटशॉट्स, बांगा बीट्स, मुंबई मास्टर्स, लखनौ वॉरियर्स आणि पुणे पिस्टॉन्स संघात मुकाबला रंगणार आहे. सायना नेहवालला हैदराबाद हॉटशॉट्स संघाने १,२०,००० तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ली चोंग वेईला मुंबई मास्टर्स संघाने १,३५,००० अमेरिकन डॉलर्स किमतीला विकत घेतले.
‘आयबीएल’ची गुणांकन पद्धती
* आयबीएलच्या सांघिक लढतीमध्ये पुरुष एकेरीचे दोन, पुरुष दुहेरीचा एक, मिश्र दुहेरीची एक आणि महिला एकेरीच्या एका सामन्याचा समावेश असेल.
* प्रत्येक सांघिक लढत जिंकणाऱ्या संघाला बोनस गुण मिळेल
* एकूणजिंकलेल्या सामन्यांसाठी गुण प्रदान करण्यात येतील
* एका संघाने दुसऱ्या संघाचा ५-० असा धुव्वा उडवला, तर विजेत्या संघाला ६ गुण देण्यात येतील. ४-१ फरकाने मात करणाऱ्या संघाला ५ तर ३-२ फरकाने जिंकणाऱ्या संघाला ४ गुण बहाल करण्यात येतील.
* याशिवाय २-३ फरकाने किंवा १-४ फरकाने पराभूत झालेल्या संघालाही २ तसेच १ गुण कमावण्याची संधी.