सन्मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम, एअर इंडिया, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांनी पुरुष गटात तर महात्मा गांधी, शिवाजी उदय, मुंबई पोलिस जिमखाना यांनी महिला गटात विजयी सलामी दिली. जामसंडे येथील इंदिराबाई महादेव ठाकूर कला-क्रीडा नगरीत सुरू असलेल्या पुरुषांच्या ‘ब’ गटातील सामन्यात भारत पेट्रोलियमने देना बँकेला ४६-१८ अशी धूळ चारली. सुनील आडके, आशिष म्हात्रे आणि शैलेश सावंत यांच्या आक्रमक चढायांमुळे भारत पेट्रोलियमने हा विजय साकारला. ‘क’ गटात एअर इंडियाने कोकण दूध संघाचा ३७-९ असा फडशा पाडला. नितीन कुंभार, प्रशांत चव्हाण या विजयाचे शिल्पकार ठरले.
‘अ’ गटात मुंबईच्या स्पो स्पोर्ट्स क्लबने देवगड आंबा उत्पादक संघाला १८-१३ असे हरवले. सागर पाटील, शैलेश गोखले, मयूर खामकर या विजयात चमकले. ‘क’ गटातील लढतीत महाराष्ट्र पोलिसांनी कोल्हापूर ली संघाविरुद्ध २३-९ अशी बाजी मारली. ‘ड’ गटात पहिल्या विजयाची नोंद करताना मुंबई पोलिसांनी मुंबई महापालिकेला ३३-१३ असे हरवले. अभिमन्यू चव्हाण, विपुल मोकल यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर मुंबई पोलिसांनी ही किमया साधली. महिलांच्या ‘अ’ गटात मुंबई पोलीस जिमखान्याला मुंबई उपनगरच्या सावित्रीबाई संघाने विजयासाठी अखेपर्यंत झुंजवले. पण मुंबई पोलिसांनी २७-१८ असा विजय मिळवला. शीतल बावडेकर, सीमा साबळे यांनी सुरेख खेळ केला.