हॉवकेज बे चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाला अमेरिकेविरुद्ध २-४ असा पराभव स्वीकारावा लागला. सुरुवातीला १-० अशी आघाडी मिळूनही भारताला त्याचा फायदा घेता आला नाही. चुरशीने झालेल्या या लढतीत अनुराधा थोकचोम हिने सहाव्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. पहिल्या पंधरा मिनिटांनंतर अमेरिकेच्या खेळाडूंनी वेगवान खेळ केला. चारच मिनिटांनी त्यांच्या जिल विटमेर हिने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. अमेरिकेच्या कॅथलीन शार्के हिने ४२ व्या व ४३ व्या मिनिटाला गोल करीत संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. ४४ व्या मिनिटाला भारताच्या अनुराधा हिने पुन्हा गोल करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. हा गोल तिने पेनल्टी कॉर्नरद्वारा केला. ४७ व्या मिनिटाला अमेरिकेला गोल करण्याची हुकमी संधी लाभली. त्याचा फायदा घेत ज्युलिया रीनप्रेच हिने अप्रतिम गोल करून संघाचा ४-२ असा विजय निश्चित केला.