Women Premier League नवी मुंबई : पहिले दोनही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांवर असलेले मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये गुरुवारी आमनेसामने येतील. पहिल्या दोन सामन्यांत मुंबईने अनुक्रमे गुजरात जायंट्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघांना, तर दिल्लीने बंगळूरु व यूपी वॉरियर्स या संघांना नमवले.
मुंबईच्या विजयात सलामीवीर हेली मॅथ्यूजने निर्णायक कामगिरी बजावली. अष्टपैलू योगदानास सक्षम हेलीकडून या सामन्यातही दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. दुसरीकडे, दिल्ली संघाच्या यशात कर्णधार मेग लॅनिंगने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिने पहिल्या दोनही सामन्यांत आक्रमक अर्धशतके झळकावली. दोन्ही संघांकडे चांगल्या फलंदाजी फळीसह गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंचे दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणता संघ विजयी घोडदौड कायम ठेवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बंगळूरुचा पुन्हा पराभव
मुंबई : हरलीन देओल (६७) आणि सोफी डंकले (६५) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर अॅश्ले गार्डनरच्या (३/३१) प्रभावी माऱ्यामुळे गुजरात जायंट्स संघाने बुधवारी ‘डब्ल्यूपीएल’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर ११ धावांनी विजय मिळवला. बंगळूरुचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने ७ बाद २०१ अशी धावसंख्या उभारली. आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बंगळूरुच्या सोफी डिवाइनने (६६) अर्धशतक झळकावले. मात्र, दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने बंगळूरुला निर्धारित षटकांत ६ बाद १९० धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले.
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१