गुवाहाटी : घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी आणि अलीकडच्या काळातील सातत्यपूर्ण कामगिरी, या सकारात्मक पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषक जेतेपदाची ४७ वर्षांपासूनची प्रतीक्षा संपविण्याचा प्रयत्न करेल. ‘आयसीसी’ महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आज, मंगळवारपासून प्रारंभ होणार असून गुवाहाटी येथे सलामीच्या लढतीत यजमान भारताची श्रीलंकेशी गाठ पडणार आहे.

महिला विश्वचषक स्पर्धा १२ वर्षांनी भारतात परतली असून जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेला भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. या स्पर्धेतील बहुतांश सामने भारतात होणार आहेत. पाकिस्तानच्या संघाने भारतात खेळण्यास नकार दिल्याने त्यांचे सामने श्रीलंकेत होतील. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान यांच्यासह गतविजेते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश असे एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ अन्य सर्व संघांविरुद्ध एकेक साखळी सामना खेळेल. एकूण २८ साखळी सामने होणार असून अव्वल चार संघ उपांत्य फेरी गाठतील.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ या स्पर्धेत आत्मविश्वासानिशी मैदानावर उतरले. भारताने अलीकडेच इंग्लंडमध्ये एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका जिंकली. पाठोपाठ त्यांनी मायदेशातील एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. या मालिकेदरम्यान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पराभवाची मालिकाही खंडीत केली. त्यामुळे आता भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

भारतीय संघासाठी सलामीची फलंदाज स्मृती मनधानाची कामगिरी निर्णायक ठरेल. स्मृतीने या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६६.२८च्या सरासरीने आणि ११५.८५च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्यात एकूण चार शतकांचाही समावेश आहे. यापैकी दोन शतके तिने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली. आता हीच लय कायम राखण्याचा तिचा मानस असेल. आपल्या पाचव्या विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या कर्णधार हरमनप्रीतची कामगिरीही भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण असून आता ऐतिहासिक जेतेपदाची त्यांना संधी आहे. भारतीय संघ २००५ आणि २०१७ मध्ये विश्वविजेतेपदाच्या जवळ पोहोचला होता, मात्र अंतिम लढतीत त्यांना अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. आता एक पाऊल पुढे जाण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.

संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मनधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, रेणुका सिंह ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरनी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड.

श्रीलंका : चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षी डीसिल्वा, अनुष्का संजीवनी, इमेशा दुलानी, देवमी विहंगा, पियुमी वाथसाला, इनोका रणवीरा, सुगंधी कुमारी, उदेशिका प्रबोधिनी, मालकी मदारा, अचिनी कुलासूरिया.

ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व?

यंदा जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियालाच प्रमुख दावेदार मानले जात आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकाचे एकूण १२ पर्व झाले असून ऑस्ट्रेलियाने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. याआधी २०२२ मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या गेल्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला नमवत जेतेपद मिळवले होते. आता एलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया वर्चस्व राखणार की अन्य संघ बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंडला चार वेळा, तर न्यूझीलंडला एकदा विश्वचषक जिंकण्याचा अनुभव आहे.