मेलबर्न : जर्मनीच्या संघाने यंदाच्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सर्वात मोठय़ा विजयाची नोंद करताना सोमवारी मोरोक्कोचा ६-० असा धुव्वा उडवला. दोन वेळचा विजेता संघ जर्मनी आणि महिला विश्वचषकात पदार्पण करणारा मोरोक्कोचा संघ यांमधील गुणवत्ता व अनुभव यातील तफावत या लढतीतून दिसून आली.
जर्मनीचे आक्रमण रोखण्यात मोरोक्कोला अपयश आले. जर्मनीने ७५ टक्के वेळ चेंडू आपल्याकडे राखला आणि गोलच्या दिशेने १६ फटके मारले. पूर्वार्धात आघाडीपटू अलेक्सांड्रा पॉपने (११ आणि ३९व्या मिनिटाला) दोन गोल नोंदवत जर्मनीला भक्कम आघाडी मिळवून दिली.उत्तरार्धातही जर्मनीने आपल्या आक्रमणाची गती कायम राखली. ४६व्या मिनिटाला क्लारा बुएलने जर्मनीचा तिसरा गोल केला. यानंतर मोरोक्कोच्या एल हाज (५४व्या मि.) आणि यास्मिन मरबेत (७९व्या मि.) यांच्याकडून झालेल्या स्वयंगोलमुळे जर्मनीला ५-० अशी आघाडी मिळाली. अखेरीस ९०व्या मिनिटाला लिया शुलेरने गोल करत जर्मनीला ६-० असा मोठा विजय मिळवून दिला.
जर्मनीचा संघ महिला विश्वचषकातील आपल्या गेल्या २० साखळी सामन्यांत अपराजित राहिला आहे. त्यांनी १६ विजय मिळवले असून चार सामने बरोबरीत राखले आहेत.दुसरीकडे, इटलीने विश्वचषकातील मोहिमेची यशस्वी सुरुवात करताना अर्जेटिनाला १-० असे पराभूत केले. इटलीकडून ख्रिस्टियाना गिरेलीने ८७व्या मिनिटाला निर्णायक गोल नोंदवला. त्यामुळे अर्जेटिनाला महिला विश्वचषकात आजवर खेळलेल्या १० सामन्यांत आठवा पराभव पत्करावा लागला.
बोर्गेसची हॅट्ट्रिक
अरी बोर्गेसच्या हॅट्ट्रिकच्या बळावर ब्राझीलने पनामाचा ४-० असा पराभव केला. बोर्गेसने १९, ३९ आणि ७०व्या मिनिटाला गोल केले. महिला विश्वचषकातील पदार्पणात हॅट्ट्रिक करणारी बोर्गेस ही एकूण पाचवी आणि ब्राझीलची पहिली खेळाडू आहे. पनामाविरुद्ध ब्राझीलचा चौथा गोल बिएट्रिझ जाओने ४८व्या मिनिटाला नोंदवला.