रोक्लॉ, पोलंड येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या चौथ्या फेरीत भारतीय महिला रिकव्‍‌र्ह संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुष रिकव्‍‌र्ह संघाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कंपाऊंड मिश्र प्रकारातही भारताला रौप्यपदकच मिळाले. भारताला या स्पर्धेत एकूण पाच पदकांची कमाई केली. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीने तीन पदकांवर कब्जा करत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत.
दीपिका कुमारी, बॉम्बयला देवी लैश्राम आणि लक्ष्मीराणी माझी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्णपदकावर कब्जा करत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. अंतिम लढतीत भारतीय संघाने मेक्सिकोचा ६-० असा धुव्वा उडवला. भारताने केलेल्या अचूक पाच लक्ष्यभेदांपैकी तीन वेळा दीपिका कुमारीनेच अचूक लक्ष्यवेध केला.
महिलांच्या वैयक्तिक रिकव्‍‌र्ह प्रकारात, कांस्यपदकासाठीच्या लढतीत दीपिकाने रशियाच्या तातिआना सेगिनावर ६-२ अशी मात केली. रिकव्‍‌र्ह मिश्र प्रकारात खेळताना दीपिकाने जयंत तालुकदारच्या साथीने बेलारुसच्या जोडीचा ६-० असा धुव्वा उडवत कांस्यपदकाची कमाई केली.
पुरुषांमध्ये मेक्सिकोच्या संघाने जयंत तालुकदार, तरुणदीप राय आणि अतन्यू दास या त्रिकुटावर ५-३ अशी मात केली. मिश्र प्रकारात अभिषेक वर्मा आणि पुर्वशा शेंडे या जोडीला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अमेरिकेच्या ब्रॅडेन गेलेथिइन आणि क्रिस्टल गॅव्हिन जोडीने अभिषेक-पूर्वशाला १५५-१५१ असे नमवले.
‘‘हा सामना फारसा कठीण नव्हता. आशियाई क्रीडा स्पर्धेतही याच कामगिरीची पुनरावृत्ती करू. या विजयाने आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. यंदाच्या हंगामात आमची कामगिरी चांगली झाली नव्हती. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर आम्ही कसून मेहनत घेतली होती. त्याचेच हे फळ आहे.’’
दीपिका कुमारी