Women’s ODI World Cup 2025 4 Semi Finalist Teams: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ आता अंतिम टप्पा येऊन पोहोचला आहे. भारतीय महिला संघाने न्यूझीलंड संघाचा ५३ धावांनी पराभव करत सेमिफायनलमधील आपले स्थान निश्चित केले. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांची २१२ धावांची भागीदारी, जेमिमा रोड्रीग्जच्या वादळी ७५ धावा व गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने न्यूझीलंड संघावर ५३ धावांनी विजय मिळवला. यासह वनडे विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारे चार संघ कोणते आहेत आणि त्यांचे सामने कधी कुठे मिळवले जाणार जाणून घेऊया.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया सध्या ११ गुणांसह गुणातालिकेत आघाडीवर आहे, तर दक्षिण आफ्रिका १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडही ९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर असलेला भारत आता ६ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंड व्यतिरिक्त श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

महिला वनडे विश्वचषकासाठी कोणकोणते संघ ठरले पात्र?

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व भारत हे चार संघ महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या सेमी फायनल साठी पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाचा महिला संघ या स्पर्धेत एकही सामना न गमावता क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर पाठोपाठ दक्षिण आफ्रिकाने सेमिफायनल गाठली. यानंतर भारताचा पराभव करत इंग्लंडने सेमी फायनल मधील आपलं स्थान पक्क केलं. तर आता भारतीय संघ आता न्यूझीलंड संघाचा पराभव करत क्वालिफाय होणारा चौथा संघ ठरला आहे.

सेमीफायनलसाठी पात्र ठरलेल्या या संघांमधील सामने पुढील आठवड्यात खेळवले जाणार आहेत. बुधवारी २९ ऑक्टोबर २०२५ ला पहिला सेमीफायनल सामना बारसपारा स्टेडियम गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई येथे खेळवला जाणार आहे. ४ संघांपैकी कोणते संघ एकमेकांशी भिडणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. दोन्ही सेमीफायनल सामने दुपारी ३ वाजता खेळवले जातील.