कोलंबो : महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आज, शनिवारी समोरासमोर येणार आहेत. श्रीलंकेला सलामीच्या लढतीत भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, हा सामना गुवाहाटी येथे झाला होता. श्रीलंकेला आता मायदेशात खेळण्याची संधी मिळणार असून याचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला झुंज द्यायची झाल्यास श्रीलंकेच्या फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल. तसेच त्यांच्या क्षेत्ररक्षणातही मोठी सुधारणा गरजेची आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने स्पर्धेची अपेक्षित विजयी सुरुवात केली होती. त्यांनी न्यूझीलंडला पराभूत केले होते. आता हीच लय कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. श्रीलंकेत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या मिळणे अपेक्षित आहे. दोन्ही संघांत गुणवान फिरकी गोलंदाज असून त्यांचे वर्चस्व पाहायला मिळू शकेल.

वेळ : दुपारी ३ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.