नवी मुंबई : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत मला चांगली कामगिरी करता येत नव्हती. मला संघाबाहेरही करण्यात आले. त्यामुळे गेला महिनाभर मी फार चिंतेत होते. माझ्या सहकारी आणि आई-वडिलांसमोर मी सतत रडत होते. या सर्व अनिश्चिततेच्या काळानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध विजयी शतक साकारणे हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते, अशी भावना जेमिमा रॉड्रिग्जने व्यक्त केली.
नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले ३३९ धावांचे आव्हान यशस्वीरीत्या गाठत भारतीय संघाने विक्रम रचला. महिला क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यासह भारताने तिसऱ्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. या यशात मुंबईकर जेमिमाचे (१३४ चेंडूंत नाबाद १२७) योगदान निर्णायक ठरले. अमनजोत कौरने विजयी चौकार मारल्यानंतर जेमिमा मैदानावर भावुक झाली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेतही तिला गेला महिनाभराचा अनुभव सांगताना अश्रू अनावर झाले.
‘‘आज मी माझ्या अर्धशतकाचा किंवा शतकाचा विचार करत नव्हते. भारतीय संघाला सामना जिंकवायचा इतकेच माझ्या डोक्यात होते. मला जीवदानही मिळाले. खेळपट्टीवर अखेरपर्यंत टिकायचे असे मी ठरवले होते. त्यात मी यशस्वी ठरले याचा आनंद आहे. गेल्या महिनाभरापासून ज्या गोष्टी घडत होत्या, त्यानंतर उपांत्य फेरीत शतक साकारणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते,’’ असे जेमिमाने सांगितले. या सामन्यात अगदी अखेरच्या क्षणी तिला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याविषयी सांगण्यात आले. याने डगमगून न जाता जेमिमाने एक विक्रमी खेळी साकारली.
‘‘गेल्या (२०२२) विश्वचषकासाठी मला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर यंदा संधी मिळाल्यावर आपल्याला काहीतरी खास करायचे आहे असे मनाशी ठरवले होते. परंतु मला वारंवार अपयश येत होते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या मी फार चांगल्या स्थितीत नव्हते. मला चिंताग्रस्त वाटत होते. मी जवळपास प्रत्येक दिवशी रडत होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी संघाबाहेर करण्यात आल्यानंतर माझ्यासमोर आणखी एक आव्हान उपस्थित राहिले. मात्र, त्यावेळी मी प्रभू येशूंवर विश्वास राखला. सहकाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी मला खूप पाठबळ दिले. ते माझ्यासाठी मोलाचे ठरले,’’ असे जेमिमा म्हणाली.
‘‘सामना संपल्यानंतर मी मोठ्या स्क्रीनकडे पाहिले आणि त्यावर भारतीय संघ विजयी झाल्याचा संदेश दिसल्यावर मला रडूच कोसळले. यावेळी मी स्वत:ला रोखू शकले नाही. नवी मुंबई माझ्यासाठी खूपच खास आहे. मी मुंबईचीच मुलगी आहे. त्यामुळे या शहरात अशा प्रकारची खेळी करण्यापेक्षा चांगले काही असूच शकत नाही. प्रेक्षकांनीही आम्हाला खूप पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांचेही आभार,’’ असे अखेरीस जेमिमा म्हणाली.
हरमनप्रीत बाद होणे ‘निर्णायक’
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना जेमिमा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी दीडशतकी भागीदारी रचत भारताला सुस्थितीत पोहोचवले होते. परंतु महत्त्वाच्या टप्प्यावर हरमनप्रीत बाद झाली. याआधी २०२२ची राष्ट्रकुल स्पर्धा, तसेच २०२२ आणि २०२४ ची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा यात अशाच प्रकारे जेमिमा आणि हरमन यांनी मोठी भागीदारी रचली होती. मात्र, हरमनप्रीत बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला होता. यावेळी तसे होणार नाही याची जेमिमाने काळजी घेतली. ‘‘हॅरीदी (हरमनप्रीत) बाद होणे हे एकप्रकारे माझ्यासाठी वरदान ठरले. त्याआधीची काही षटके थकवा जाणू लागल्याने मला लक्षपूर्वक खेळ करण्यात अडचण येत होती. मात्र, ती बाद झाल्यानंतर आपल्याला जबाबदारीने खेळावे लागणार याची मला जाणीव झाली. मी पुन्हा लक्ष देऊन आणि अधिक सावधपणे फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मी शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकू शकले याचा आनंद आहे,’’ असे जेमिमा म्हणाली.
