वृत्तसंस्था, सिंगापूर

विद्यामान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनला पांढऱ्या मोहऱ्यांचा योग्य वापर करण्यात पुन्हा अपयश आले. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील शुक्रवारी झालेल्या चौथ्या डावात भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेशने डिंगला बरोबरीत रोखले.

जगज्जेतेपदाच्या लढतीत डिंगला दुसऱ्यांदा पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळाली. मात्र, दुसऱ्या डावाप्रमाणेच चौथ्या डावातही त्याला बरोबरीवरच समाधान मानावे लागले. ‘‘या डावात मी सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला. मी पटावर भक्कम स्थिती मिळवली होती, पण याचा मला फायदा करून घेता आला नाही. या लढतीचे अजून बरेच डाव शिल्लक आहेत. मी आता चांगल्या मन:स्थितीत आहे,’’ असे चौथ्या डावानंतर डिंग म्हणाला.

एकूण १४ डावांच्या या लढतीत आता २-२ अशी बरोबरी झाली असून सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू जगज्जेता ठरेल. डिंगने पहिला डाव जिंकल्यानंतर तिसऱ्या डावात गुकेशने बाजी मारली होती. दुसरा आणि चौथा डाव बरोबरीत सुटला.

‘‘डावाच्या अखेरीस मला डिंगवर दडपण आणण्याची संधी होती. काळ्या मोहऱ्यांनी खेळताना मी सकारात्मक निकाल मिळवण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले. मात्र, मला निर्णायक चाल रचता आली नाही,’’ असे १८ वर्षीय गुकेशने नमूद केले. पाचव्या डावात गुकेश पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळेल.

हेही वाचा >>>VIDEO: बापरे! फाफ डू प्लेसिस बॉल बॉयवरून गोलांटी उडी खात पडला मैदानाबाहेर, लाईव्ह सामन्यात घडली मोठी घटना

त्याआधी, चौथ्या डावात डिंगने ‘बर्ड्स’ पद्धतीने सुरुवात करताना वजिराच्या उंटावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. डिंगला गुकेशच्या कौशल्याची कसोटी पाहायची असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, गुकेशनेही अचूक चाली रचताना डिंगला वरचढ ठरू दिले नाही. दोघांनी मोहऱ्यांची आदलाबदल केल्याने पटावर समान स्थिती राहिली. डिंग आणि गुकेश हे दोघेही फारसा धोका पत्करण्यास तयार नव्हते. त्यामुळे ४२ चालींअंती त्यांनी डाव बरोबरीत सोडविण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगज्जेतेपदाच्या लढतीतील चौथ्या डावाची सुरुवात ही रिचर्ड रेटी या अपार प्रतिभेच्या खेळाडूच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या पद्धतीने झाली. पहिल्या चालीतच अश्वाला बाहेर काढून जगज्जेत्या डिंग लिरेनने आपण कोणत्याही प्रकारच्या खेळाला तयार आहोत असे जणू जाहीर केले. रेटी सुरुवात म्हणजे पांढऱ्या सोंगट्यानी खेळणारा खेळाडू आक्रमक पवित्रा न घेता काळ्या सोंगट्यांकडून चूक होण्याची वाट बघतो. मात्र, अननुभवी गुकेशने तोडीसतोड खेळ करून डिंगला वरचष्मा मिळवू दिला नाही; उलट स्वत:च्या अश्वाला तेराव्या खेळीत पटाच्या मध्यावर रोवून ठेवले. अखेर सर्व सोंगट्यांची आदलाबदल होऊन तज्ज्ञांच्या अपेक्षेनुसार डाव बरोबरीत सुटला. – रघुनंदन गोखलेद्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक.