सुआरेझचे ‘चावा ओपनर’
उरुग्वेच्या लुइस सुआरेझचे चावा प्रकरणाचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. खेळभावनेला बट्टा लावणाऱ्या या प्रकरणानंतर जगभरातल्या लोकांनी उपहासाच्या माध्यमातून या घटनेवर भाष्य केले. आता तर सुआरेझच्या घटनेतून व्यापारी फायदा करून घेण्याचा प्रयत्न चीनमध्ये होतो आहे. चीनमधील लोकप्रिय ‘ताओबाओ’ संकेतस्थळाने विविध उत्पादनांच्या बाटल्या उघडण्यासाठीच्या यंत्रावर सुआरेझचे चित्र रेखाटले आहे. १६.८० युआन (२.७० अमेरिकन डॉलर्स) इतक्या रकमेला हे व्यंगात्मक चित्र असलेले बॉटल ओपनर उपलब्ध आहे. या ‘चावा ओपनर’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चीनमधील वृत्तपत्रांनी म्हटले आहे. ठज्या दिवशी उरुग्वे-इटली सामन्यातील ही घटना मी पाहिली तेव्हा मला ही कल्पना सुचली असे ताओबाओवरील केंद्राचे मालक वांग लिन यांनी सांगितले. ही खपाची चांगली कल्पना आहे. मात्र गरजेएवढा पुरवठा आम्ही वेळेत पूर्ण करू शकत नाही ही जराशी अडचण आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
आता जर्मनी..
फिफा फुटबॉल विश्वचषक सुरू झाल्यापासून सट्टेबाजारात आघाडीवर असलेल्या ब्राझीलला पहिला धक्का बसला आहे. ब्राझीलचे स्थान आता जर्मनीने घेतले आहे. कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात ब्राझील विश्वविजेत्यासारखा खेळला नाही. आता ब्राझीलला मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत जर्मनीला सामोरे जायचे आहे. सट्टेबाजांनी दोघांच्या भावात फारसा फरक दाखविलेला नाही. ब्राझीलला ९० पैसे देऊ करणाऱ्या सट्टेबाजांनी जर्मनीला ९५ पैसे देऊन भाकीत करणे टाळले आहे. पंटर्सपुढेही त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे दोन बलाढय़ संघ उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार याची कल्पना आल्यानंतर सट्टेबाजारात जोरदार उलाढाल सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारातही आता जर्मनीला (१२/५) पहिले स्थान मिळाले आहे.  त्यापाठोपाठ ब्राझील (१३/५), अर्जेंटिना (१७/४), नेदरलँड (९/२), बेल्जियम (१४/१) या संघांचा क्रमांक लागतो. ही क्रमवारीही बदलेल, असे एका सट्टेबाजाने सांगितले. फ्रान्सच्या जेम्स रॉड्रिगेझने आता सर्वाधिक गोलकर्ता म्हणून अग्रक्रम पटकावला आहे.  त्यापाठोपाठ लिओनेल मेस्सी, नेयमार, थॉमस म्युलर, रॉबिन व्हॅन पर्सी यांना सट्टेबाजांनी पसंती दिली आहे. नेयमार जखमी झाल्यानंतर त्याचा भावही कमी झाला आहे. भारतीय सट्टेबाजारातही जर्मनीचा संघ सरस ठरला आहे. साधारणत: आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात जो भाव चालतो त्याच अनुषंगाने भारतीय सट्टेबाजही भाव जाहीर करीत असतात, अशी माहितीही या सट्टेबाजाने दिली. आणखी काही काळानंतर ब्राझील विश्वक्रमाच्या स्पर्धेतून बाहेर होईल, असाही सट्टेबाजांचा आता होरा आहे. दिवसागणिक बदलत जाणाऱ्या भावाबाबत सट्टेबाजही संदिग्ध आहेत.
निषाद अंधेरीवाला

एक तू ही सहारा..
जे काही आयुष्यात होते ते देवामुळेच होते, अशा भावनेने ब्राझीलच्या विजयानंतर देवाचे आभार मानायला हा चाहता विसरला नाही. ब्राझीलने सामना जिंकल्यावर जिथे सारेजण जल्लोषामध्ये मश्गूल होते, तिथे या चाहत्याने पहिल्यांदा देवाचे स्मरण केले.