रबात : कतार येथे झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मोरोक्कोच्या संघाचे मायदेशात थाटात स्वागत करण्यात आले. विश्वचषकात सनसनाटी निकालांची नोंद करताना मोरोक्कोने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. ही कामगिरी करणारा मोरोक्को पहिलाच अरब आणि आफ्रिकन देश ठरला. 

मायदेशी परतल्यावर मोरोक्को संघाची बसमधून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी राजधानी रबातच्या रस्त्यावर चाहत्यांनी दुतर्फा गर्दी केली होती. ड्रमच्या तालावर नाचतच चाहते खेळाडूंच्या बसबरोबर पुढे सरकत होते. मोरोक्कोच्या रस्त्यांवर यावेळी प्रथमच मोठय़ा प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागली होती.

खुल्या बसमध्ये असलेले खेळाडू आणि प्रशिक्षक वालिद रेग्रागुई यांनी हात उंचावून चाहत्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. अशाच गर्दीतून वाट काढत बस राजवाडय़ावर पोहोचली. तेथे राजे मोहम्मद सहावे यांनी खेळाडूंचे स्वागत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारताना मोरोक्कोने बेल्जियम, स्पेन आणि पोर्तुगालसारख्या बलाढय़ संघांना पराभूत केले. उपांत्य फेरीत त्यांना फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला. आमच्या संघाची ही कामगिरी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल, अशी प्रतिक्रिया कॅफे चालक असलेल्या २७ वर्षीय रेडा गाझीने व्यक्त केली.