बालपणीच खेळाचे बाळकडू मिळत असल्यामुळे व अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव पाठिशी असल्यामुळे आम्ही जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत वर्चस्व गाजवू, असा आत्मविश्वास रशियाचे अग्रमानांकित खेळाडू व्लादिमीर फेदोसीव्ह व अ‍ॅलेक्झांड्रा गोर्याश्किना यांनी व्यक्त केला.
व्लादिमीर म्हणाला की, ‘‘स्पर्धेत अनेक तुल्यबळ खेळाडूंचा सहभाग असल्यामुळे विजेतेपदासाठी खूप झगडावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक फेरीत सावध पवित्रा घेतच मी खेळणार आहे. वरिष्ठ खेळाडूंबरोबर सराव केल्याचा फायदा मला मिळेल, अशी आशा आहे.’’ अ‍ॅलेक्झांड्रा हिने सांगितले, ‘‘खूप आव्हानात्मक स्पर्धा असली तरी सर्वोच्च कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. सांघिक सरावाऐवजी आमची भिस्त वैयक्तिक सरावावर असल्यामुळे माझी तयारी चांगली झाली आहे.’’
भारताच्या खेळाडूंवर दडपण नाही : विदित
‘‘ही स्पर्धा भारतात होत असली तरी आमच्यावर कोणतेही दडपण नाही, उलट त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. कारण परदेशात गेल्यानंतर तेथे जेटलॅग, भोजन आदींबाबत अनेक समस्या असतात. या समस्या भारतात जाणवणार नाहीत. काही वेळा नवोदित खेळाडूही अनपेक्षित धक्का देतात. त्यामुळे कोणताही फाजील आत्मविश्वास न ठेवता मी खेळणार आहे. बुद्धिबळ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकामुळे माझे मनोधैर्य उंचावले आहे,’’ असे भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने सांगितले.