महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेतील एलिमिनीटर सामना मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला संघात खेळला गेला मुंबई इंडियन्सच्या इस्सी वोंगच्या भेदक हॅटट्रिकने यूपी वॉरिअर्सवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्याच बरोबर मुंबईने फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. या सामन्यात मुंबईची वेगवान गोलंदाज इस्सी वोंग हिने इतिहास रचला. अशाप्रकारे ती डब्ल्यूपीएल स्पर्धेत हॅटट्रिक घेणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध मोठा विजय मिळवला. त्यांनी हा सामना ७२ धावांनी जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. तेथे ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी मुकाबला करतील. हा सामना २६ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. गुणतालिकेत अव्वल दोन संघच अंतिम फेरीत आमनेसामने येतील. मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीने तिसरे स्थान मिळवून एलिमिनेटरमध्ये प्रवेश केला होता, परंतु पुढे प्रगती करता आली नाही.

नॅटली सिव्हर-ब्रंटच्या नाबाद ७२ आणि इस्सी वोंगच्या हॅटट्रिकमुळे मुंबईने शानदार विजय मिळवला. इस्‍सी वाँगने चार षटकांत १५ धावा देत चार बळी घेतले. महिला प्रीमियर लीगमध्ये हॅटट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली. तिने किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एक्लेस्टोनला बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. यूपीकडून किरण नवगिरे एकाकी लढली. २७ चेंडूत ४३ धावा करून ती बाद झाली. तिला दुसऱ्या बाजूनेही साथ मिळाली नाही. दीप्ती शर्मा १६, ग्रेस हॅरिस १४ आणि कर्णधार अ‍ॅलिसा हिली ११ धावा करून बाद झाल्या. यूपीच्या ११ फलंदाजांपैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. मुंबईकडून इस्‍सी वोंग व्यतिरिक्त सायका इशाकने २ विकेट्स घेतले. नॅटली सिव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज आणि जिंतिमनी कलिता यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा: IND vs AUS: “आता अजून काय करायचं…”, सुर्याच्या खराब फलंदाजीवर निशाना संजू सॅमसनसाठी शशी थरूर मैदानात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात ४६ धावा केल्या. भाटिया १८ चेंडूत २१ धावा करून बाद झाली. यानंतर हेली मॅथ्यूज देखील फार काही करू शकली नाही तिने २६ चेंडूत २६ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकली नाही आणि १५ चेंडूत १४ धावा करून तंबूत परतली. मात्र, सिव्हर ब्रंटने एक बाजू लावून धरत २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. केरने १९ चेंडूत २९ धावा केल्या. पूजाने शेवटच्या चेंडूंवर मोठे फटके खेळत ४ चेंडूत ११ धावा केल्या. ब्रंटने ३८ चेंडूत ७२ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. यूपीकडून सोफीने २, अंजली आणि चोप्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.