scorecardresearch

राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वगळले! ; २०२६च्या स्पर्धेसाठी नेमबाजीचा समावेश

राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी २०२६च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली.

राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वगळले! ; २०२६च्या स्पर्धेसाठी नेमबाजीचा समावेश
प्रातिनिधिक छायाचित्र

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे २०२६ साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचे पुनरागमन होणार असून कुस्ती आणि तिरंदाजी या खेळांना मात्र स्पर्धेतून वगळण्यात आले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी २०२६च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली. यात २० खेळ आणि २६ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

या वर्षी बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वादग्रस्तरीत्या वगळण्यात आले होते. मात्र, २०२६च्या स्पर्धेत नेमबाजीचे पुनरागमन होणे ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे. राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताला सर्वाधिक १३५ पदके (६३ सुवर्ण, ४४ रौप्य व २८ कांस्य) ही नेमबाजीत मिळाली आहे. २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकूण पदकांपैकी २५ टक्के पदके ही नेमबाजांनी मिळवून दिली होती. या स्पर्धेत भारताने एकूण ६६ पदके जिंकली होती, ज्यापैकी १६ पदके (७ सुवर्ण, ४ रौप्य, ५ कांस्य) नेमबाजीत मिळाली होती.  

कुस्तीला राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळण्यात येणे हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला कुस्तीपटूंनी वर्चस्व गाजवताना सर्व १२ वजनी गटांत पदके (६ सुवर्ण, १ रौप्य, ५ कांस्य) पटकावली होती. २०१० पासून सलग चार पर्वामध्ये कुस्तीचा समावेश होता. परंतु कुस्ती हा खेळ ऑस्ट्रेलियामध्ये फारसा प्रचलित नाही. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचे खेळ हे यजमान देशाकडून निवडले जातात. 

तिरंदाजी हा खेळ केवळ दोन (१९८२ आणि २०१०) राष्ट्रकुल स्पर्धामध्ये खेळला गेला आहे. या खेळाच्या पदकतालिकेत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिरंदाजीचा समावेश न होण्याचा भारताला फटका बसू शकेल.

काही महिन्यांपूर्वी २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खेळांची प्रारंभिक यादी जाहीर करण्यात आली होती आणि यात नेमबाजी, कुस्ती व तिरंदाजी या खेळांचा समावेश नव्हता. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला पत्र लिहून आपली नाराजी कळवली होती. या तीन खेळांना वगळण्यात येणे हे धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर अंतिम यादीत नेमबाजीचा समावेश करण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या