रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. बलात्काराच्या प्रकरणात अडकलेल्या यश दयालची कारकीर्द आता धोक्यात आल्याचं दिसून येत आहे. सततच्या आरोपांमुळे त्याला एका मोठ्या लीगमधून वगळण्यात आलं आहे. यश दयालवर १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
यश दयालवर करण्यात आलेल्या आरोपांनंतर आता त्याच्यावर अटकेचा धोका आहे. यश दयाल हा आयपीएल २०२५ च्या विजेत्या आरसीबी संघाचा भाग होता. त्याने या हंगामात चांगली कामगिरी केली आणि १५ सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या, परंतु आता त्याची कारकीर्द अडचणीत आहे.
रिपोर्ट्सनुसार, आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालला यूपी टी-२० लीगमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. यूपी क्रिकेट असोसिएशनने (यूपीसीए) हा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे हा वेगवान गोलंदाज पुढील हंगामात खेळू शकणार नाही. जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात यश दयालविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर यूपीसीएने हा निर्णय घेतला आहे. यश दयालवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
यश दयालच्या कारकिर्दीला मोठा फटका
रिपोर्ट्सनुसार, यूपी टी-२० लीग संघ गोरखपूर लायन्सने या वेगवान गोलंदाजाला ७ लाख रुपयांना खरेदी केलं होतं, परंतु आता तो या लीगमध्ये खेळू शकणार नाही. यादरम्यान, यश दयालला राजस्थान उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
बलात्कार प्रकरणात यश दयालला राजस्थान उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने या प्रकरणात त्याची अटक आणि पोलिस कारवाई थांबवण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटलं होतं की हे प्रकरण अल्पवयीन मुलीशी संबंधित आहे, त्यामुळे स्थगिती देता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होईल.
यश दयालविरुद्ध पहिला गुन्हा गाझियाबादमध्ये दाखल झाला होता. यश दयालने गाझियाबादमधील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचे सांगण्यात आले. पण अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात यश दयालची अटक थांबवली होती. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला जयपूरमध्ये यश दयालविरूद्ध खटला दाखल करण्यात आला. यावेळी राजस्थान उच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला.