भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीत इंग्लंडने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांचं लक्ष्य दिलं असताना भारतीय संघाला एकही विकेट मिळवता आलेली नाही. दरम्यान सिराजच्या गोलंदाजीवर विकेट मिळणार असं दिसत असतानाच यशस्वी जैस्वालने अजून एक सोपा झेल सोडला आहे.
भारतीय संघाला पाचव्या दिवशी एकही विकेट घेण्यात यश आलं नाहीये. बेन डकेट आणि झॅक क्रॉलीची जोडी सिराज बुमराह प्रसिध सर्व गोलंदाजांसमोर कमालीची फलंदाजी करत धावा करत आहे. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी १८० अधिक धावांची विक्रमी भागीदारी रचली आहे. भारताला पिचकडूनही फारशी मदत न मिळाल्याने इंग्लंडचा संघ सहज धावा करत आहे.
मोहम्मद सिराजला भले सामन्यातील दुसऱ्या डावात विकेट मिळाली नाही, पण त्याने स्पेलमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. ३९व्या षटकातील पाचवा चेंडू सिराजने बाऊन्सर टाकला. डकेटने फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेऊन हवेत उंच उडाला. सीमारेषेजवळ जैस्वाल झेल टिपण्यासाठी पुढे आला, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि जमिनीवर पडला.
यशस्वी जैस्वालच्या हातातून सुटलेला झेल पाहून गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराज जोरात ओरडला आणि त्याने राग काढला. तर भारताचे सर्वच खेळाडू थोडे अवाक् झाले. भारतासाठी ही मोठी विकेट ठरणार होती. कारण बेन डकेट ९७ धावांवर खेळत होता. पण जैस्वालने झेल सोडल्यामुळे डकेटने शतक पूर्ण केले, यातबरोबर तो शानदार फटकेबाजी करत चांगली फलंदाजी करतानाही दिसत आहे.
अखेरीस प्रसिध कृष्णाने झॅक क्रॉलीला झेलबाद करवत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. इंग्लंडचा संघ पहिल्या विकेटसाठी केलेल्या १८८ धावांच्या भागीदारीमुळे मजबूत स्थितीत दिसत आहे. त्यामुळे आता या सामन्यात यशस्वी जैस्वालने सोडलेल्या या झेलचा किती मोठा परिणाम होईल, यावर सर्वांच्या नजरा आहेत.