जैस्वालने भारताच्या इंग्लंड दौऱ्याची यशस्वी सुरूवात केली आहे. त्याने लीड्सवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावलं आहे. यशस्वी जैस्वालचं इंग्लंडच्या धर्तीवरील हे पहिलं शतक आहे. जैस्वालचं शतक आणि शुबमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी चांगली धावसंख्या उभारली आहे.

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने हेडिंग्ले लीड्सच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याच्या कसोटी कारकिर्दीत आणखी एक शतक झळकावलं. २० जूनला सुरू झालेल्या कसोटीच्या पहिल्या डावात जैस्वालने तंत्रशुद्ध फलंदाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेतली. त्याच्या खेळीमुळे भारताला चांगली सुरूवात मिळाली आहे आणि पहिल्या कसोटीत भारताने इंग्लंडवर आपला दबदबा कायम राखला आहे.

हेडिंग्लेच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो या मैदानाच्या अलिकडच्या रेकॉर्डचा विचार करता इंग्लिश संघाच्या बाजूने होता. परंतु यशस्वी जैस्वालने आपल्या फलंदाजीने हा निर्णय चुकीचा सिद्ध केला. केएल राहुलसह डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या जैस्वालने सुरुवातीपासूनच समजूतदारपण खेळी केली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या स्विंग गोलंदाजीचा चांगला सामना करत धावा केल्या.

यशस्वी जैस्वालने १५४ चेंडूत १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं. सलग दोन चौकार मारत जैस्वाल ९९ धावांवर पोहोचला, त्यानंतर षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत जैस्वालचं शतक पूर्ण झालं. जैस्वालने मैदानात लांब धाव घेत आपल्या शतकाचा आनंद साजरा केला. जैस्वालने शतकानंतर उडी मारत पारंपारिकपणे त्याचं शतकाचं सेलिब्रेशनही केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जैस्वालने प्रत्येक कसोटी दौऱ्यावर पहिल्या सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. जैस्वालने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील पहिल्याच सामन्यात शतक केलं होतं. आता इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्या सामन्यात त्याने शतक करत त्याचा दबदबा कायम राखला आहे. याचबरोबर यशस्वी जैस्वालने त्याच्या २० कसोटी सामन्यांमध्ये त्याचं पाचवं कसोटी शतक झळकावलं आहे.