India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्याचा थरार ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ३९६ धावा केल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने दमदार शतकी खेळी केली. या खेळीनंतर त्याने भन्नाट सेलिब्रेशन केलं होतं. दरम्यान तिसऱ्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर, त्याने हे सेलिब्रेशन नेमकं कोणासाठी केलं होतं याबाबत खुलासा केला आहे.
यशस्वी जैस्वालचं शतक
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. सलामीवीर फलंदाज केएल राहुल स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेला साई सुदर्शन देखील लवकर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने आकाशदीपसोबत मिळून शतकी भागीदारी केली. यादरम्यान आकाशदीपने ६६ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने १२५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं.
यशस्वीने शतक पूर्ण केल्यानंतर हेल्मेट काढलं, बॅट खाली ठेवली आणि हाताने हार्ट बनवून फ्लाईंग किस दिली. हे सेलिब्रेशन त्याने स्टँडमध्ये असलेल्या रोहित शर्मासाठी होतं असं म्हटलं जात होतं. पण जैस्वालने सामन्यानंतर या सेलिब्रेशनबाबत खुलासा केला. हे सेलिब्रेशन त्याच्या आई – वडिलांसाठी होतं. त्याचे आई -वडील हा सामना पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे हा भावनिक क्षण असल्याचं त्याने सांगितलं.
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३७४ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसातील शेवटच्या सत्रात इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. जॅक क्रॉउले आणि बेन डकेट यांनी मिळून ५० धावा जोडल्या. पण दिवसाच्या शेवटच्या षटकात मोहम्मद सिराजने जॅक क्रॉउलेला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर चौथ्या दिवशी फलंदाजी इंग्लडला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. प्रसिध कृष्णाने बेन डकेटला झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर मोहम्मद सिराजने कर्णधार ओली पोपला पायचीत करत माघारी धाडलं.