केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा कसोटी सामना खेळवला जात आहे. यजमान संघाने सलग पाच सामन्यांची नाणेफेक जिंकली आहे. यासह बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत इंग्लंडचं नेतृत्त्व करत असलेल्या ऑली पोपने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यादरम्यान भारताला चौथ्याच षटकात यशस्वी जैस्वालच्या रूपात धक्का बसला आहे.
इंग्लंडकडूनही पाचव्या कसोटी सामन्यासाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. संघाचा वेगवान गोलंदाज गस एटकिन्सन दुखापतीनंतर प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला आहे. यासह संघात पुनरागमन करताच त्याने त्याच्या स्पेलमधील दुसऱ्याच षटकात संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यशस्वी जैस्वाल एटकिन्सनचा कमालीच्या लेंग्थसह टाकलेला चेंडू कळण्याआधीच तो बाद झाला. याशिवाय ऑली पोपचा योग्य रिव्ह्यू आणि यामुळे संघाला विकेट मिळाली आहे.
गस एटकिन्सनच्या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल स्ट्राईकवर होता. गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा एटकिन्सनने योग्य लेंग्थवर कमालीचा चेंडू टाकला. जैस्वाल चेंडू खेळायला चुकला आणि चेंडू त्याच्या आधी उजव्या पायावर स्टम्पच्या मधोमध लागला, त्यानंतर जाऊन दुसऱ्या पायाच्या पॅडला लागला. त्यामुळे एकावेळी दोन आवाज आले, तर बॅटही जवळच होती. यामुळे पंचांनी नाबाद दिलं.
बेन स्टोक्स आधी झाला चकित नंतर विकेट पाहून अशी दिली प्रतिक्रिया
इंग्लंडच्या संपूर्ण संघाने अपील केलं, तर रिव्ह्यूसाठी चर्चा सुरू झाली. सामन्याची सुरूवात आहे, त्यात दोन आवाज आलेत; त्यामुळे इंग्लंड रिव्ह्यू घेईल यात शंका होती. पण नवा कर्णधार पोपने रिव्ह्यू घेतला. हे पाहून स्टोक्स आणि खेम्यातील सर्वच चकित झाले. त्यानंतर रिव्ह्यूमध्ये दिसलं की चेंडू बॅटला नाही तर दोन्ही पायांच्या पॅडला लागली आणि बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू थेट स्टम्पवर आदळताना दिसला आणि यामुळे जैस्वालला बाद देण्यात आलं.
ऑली पोपने ४ सामन्यांमध्ये इंग्लंडच्या कसोटी संघाचं नेतृत्त्व केलं आहे. पण त्याने पहिल्यांदाच एक यशस्वी रिव्ह्यू घेतला आहे. तिसऱ्या पंचांनी इंग्लंडच्या बाजूने निर्णय दिल्याचं पाहून यजमान संघाने मैदानावर जल्लोष केला, तर पोपने ड्रेसिंग रूमकडे पाहत हात उंचावले. तितक्यात चकित झालेल्या स्टोक्सचे हावभाव आनंदाने भरलेले होते आणि तो देखील पोपचं टाळ्या वाजवत कौतुक करत होता.
भारत आणि इंग्लंडची पाचव्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन
भारतीय संघ
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज</p>
इंग्लंड संघ
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग