Yashasvi Jaiswal: क्रिकेट हा खेळ चाहत्यांशिवाय अपूर्ण आहे, असं अनेक दिग्गज खेळाडूंनी सांगितलं आहे. टीव्ही आणि मोबाईलवर कोट्यावधी चाहते क्रिकेटचे सामने लाईव्ह पाहतात. पण, जोपर्यंत चाहते मैदानावर जाऊन आपल्या आवडत्या खेळाडूंना सपोर्ट करत नाहीत, तोपर्यंत खेळाडूही हवा तितका जोर लावत नाहीत. पण मैदान आपल्याला पाठिंबा देत असलेल्या चाहत्यांनी भरलेलं असलं, तर खेळाडूही पूर्ण जोर लावतात. काही चाहते खूप खास असतात. अशाच एका १२ वर्षीय खास चाहत्याने यशस्वी जैस्वालला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंघमहॅममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अव्वल दर्जाचा खेळ करून दाखवला आहे. गिलने दमदार फलंदाजी केली. सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालनेही फलंदाजीत चांगला जोर लावला. मात्र, त्याचं मैदानाबाहेर केलेल्या कामगिरीमुळे जोरदार कौतुक होत आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
यशस्वीने घेतली खास चाहत्याची भेभारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी आलेल्या १२ वर्षीय रवीने यशस्वी जैस्वालला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. रवी हा यशस्वी जैस्वाल खूप मोठा चाहता आहे. दरम्यान दुसरा कसोटी सामना सुरू असताना यशस्वी जैस्वालने त्याची ही इच्छा पूर्ण केली. यासह त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला बॅटही गिफ्ट केली. हा मन जिंकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर
भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शुबमन गिलने १६१ धावांची दमदार खेळी केली. तर रवींद्र जडेजाने ६९ आणि ऋषभ पंतने ६५ धावांची खेळी केली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४२७ धावा करत डाव घोषित केला. यासह इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. इंग्लंडचे ३ प्रमुख फलंदाज तंबूत परतले आहेत. चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडला ३ गडी बाद ७२ धावा करता आल्या आहेत. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी अजूनही ५३६ धावा करायच्या आहेत.