टोक्यो : युवा भारतीय कुस्तीपटू सोनम मलिकचे ऑलिम्पिक पदार्पण मंगळवारी पहिल्याच फेरीत पराभवामुळे संपुष्टात आले. ६२ किलो वजनी गटात मोंगोलियाच्या बोलोर्टुया खुरेलखूने तिला पराभूत केले. १९ वर्षीय सोनमने २-० अशी आघाडी घेतली. पण ३५ सेकंदांत बोलोर्टुयाने बरोबरी साधली. ही गुणसंख्या उत्तरार्धापर्यंत कायम राहिली. पण अखेरच्या प्रयत्नात बोलोर्टुयाने दोन गुण मिळवत विजय प्राप्त केला. बरोबरी झालेल्या लढतीत एकाच प्रयत्नात अधिक गुण मिळवणारा कुस्तीपटू विजयी होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनम ही बोलोर्टुयापेक्षा सरस कुस्तीपटू आहे. परंतु अतिबचावात्मक खेळाचा तिला फटका बसला. तिने या लढतीत बºयाच चुका केल्या. परंतु किशोरवयातच ऑलिम्पिक स्तराचा घेतलेला अनुभव तिला भविष्यात उपयुक्त ठरेल. – अजमेर मलिक, प्रशिक्षक

तजिंदर, अन्नू यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश

टोक्यो : गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर आणि भालाफेकपटू अन्नू राणी यांचे ऑलिम्पिक अभियान मंगळवारी संपुष्टात आले. अ-गटाच्या पात्रता फेरीत १६ स्पर्धकांपैकी १३वे स्थान मिळाल्यामुळे आशियाई विक्रमवीर तजिंदर अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला, तर अन्नूला (५४.०४ मीटर) १४ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

जूनमध्ये झालेल्या इंडियन ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २१.४९ मीटर गोळा फेकून ऑलिम्पिकसाठी पात्रता ठरलेल्या तजिंदरने ऑलिम्पिकमध्ये पहिल्या प्रयत्नात १९.९९ मीटर अंतरावर गोळा फेकला. खांद्याला पट्टी बांधून आलेल्या तजिंदरचे पुढील दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.

अ-गटात अन्नूने पहिल्या प्रयत्नात ५०.३५ मीटर भाला फेकला, तर दुसºया प्रयत्नात ५३.१९ मीटर अंतर गाठले. फेडरेशन चषक स्पर्धेत अन्नूने ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला होता. पण ६३.२४ मीटर ही आपली सर्वोत्तम कामगिरीसुद्धा तिला करता आली नाही.

वारहोमचा नवा विश्वविक्रम

टोक्यो : नॉर्वेचा धावपटू कस्र्टन वारहोमने मंगळवारी पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत स्वत:चाच विश्वविक्रम मोडून सुवर्णपदक पटकावले. दोन जागतिक पदके नावावर असणाºया वारहोमने ४५.९५ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला ओस्लो येथे झालेल्या स्पर्धेत त्यानेच ४६.७० सेकंद अशी वेळ नोंदवली होती. अमेरिकेच्या राज बेन्जामिन (४६.१८) आणि ब्राझीलचा अ‍ॅलिसन सँटोस (४७. १०) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले.

बाइल्सचे दमदार पुनरागमन

टोक्यो : काही दिवसांपूर्वी मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे अनेक क्रीडा प्रकारांतून माघार घेणारी अमेरिकेची मातब्बर जिम्नॅस्टिक्सपटू सिमोन बाइल्सने मंगळवारी झोकात पुनरागमन केले. दोन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बाइल्सने महिलांच्या बॅलेन्स बीम प्रकारात कांस्यपदक मिळवले. तिने एकूण १४.०० इतके गुण मिळवले. चीनची जुआन चेनचेन आणि टँग झिंग यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले.

जमैकाच्या थॉमसन-हेराचे निर्विवाद वर्चस्व

टोक्यो : जमैकाची धावपटू एलिन थॉमसन-हेराने महिलांच्या धावण्याच्या शर्यतींवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. २९ वर्षीय थॉमसन-हेराने मंगळवारी महिलांची २०० मीटर शर्यत २१.५३ सेकंदांत जिंकताना चौथ्या सुवर्णपदकावर नाव कोरले. ३३ वर्षांपूर्वीच्या विश्वविक्रमाने तिला थोडक्यात हुलकावणी दिली. १९८८मध्ये फ्लोरेन्स जॉयनरने २१.३४ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली होती. तीन दिवसांपूर्वीच थॉमसन-हेराने महिलांच्या १०० मीटर सुवर्ण जिंकले होते. त्याशिवाय महिलांच्या ४ बाय ४०० मीटर शर्यतीतसुद्धा जमैकानेच अग्रस्थान मिळवले.

राणा यांच्याकडे दुर्लक्ष

नवी दिल्ली : नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांना ऑलिम्पिकसाठी राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरआय) केलेल्या अधिस्वीकृतीधारक व्यक्तींच्या यादीत जाणीवपूर्वक समावेश न करण्यात आल्याचे वृत्त मंगळवारी समोर आले. त्यामुळे राणा यांना अभिषेक वर्मासह टोक्योला जाता आले नाही. मनू भाकरने ऑलिम्पिकमधील अपयशासाठी प्रशिक्षक राणा यांच्याशी झालेल्या मतभेदाला कारणीभूत धरले. ऑलिम्पिकपूर्वी क्रोएशिया येथे झालेल्या विश्वचषकासाठीही राणा गेले नाहीत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young indian wrestler sonam malik olympic debut first round ended in defeat akp
First published on: 04-08-2021 at 00:56 IST