भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला. बीसीसीआयने युवराजसारख्या खेळाडूला निवृत्त होण्यापूर्वी एक सामना खेळू द्यायला हवं होतं, असं मत क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केलं. युवराज आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातलं तथाकथित द्वंद्व सर्वांनाच माहिती आहे. युवराजच्या निवृत्तीनंतर त्याचे वडील योगराज सिंह यांनी धोनीवर आपला निशाणा साधत, युवराजत्या निवृत्तीला धोनी अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असल्याची टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपला मुलगा भारतीय संघातील राजकारणाचा बळी ठरल्याचं योगराज सिंह यांनी म्हटलं आहे. युवराजच्या निवृत्तीमागे एक मोठा कट असल्याचंही योगराज यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. “भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूंना योग्य पद्धतीने निरोप दिला गेला नाही. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग यांच्यासोबत जे घडलं तेच आता युवराजसोबत घडलंय. व्ही.व्ही.एस.लक्ष्मण सारख्या महान खेळाडूलाही अशाच पद्धतीने निवृत्ती स्विकारावी लागली. यासाठी केवळ एकमेव माणूस जबाबदार आहे.” नाव न घेता योगराज यांनी धोनीला आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं.

मुलाखतीदरम्यान योगराज यांना तुमच्या आरोपांचा रोख धोनीकडे आहे का असा प्रश्न विचारला….मात्र योगराज यांनी सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही असं म्हटलं आहे. गेली १५ वर्ष तो घाणेरडं राजकारण खेळतो आहे. कित्येक खेळाडूंचं आयुष्य त्याने बरबाद केलं आहे. विश्वचषक संपू द्या, या सर्व गोष्टी मी पुढे आणणार आहे. तो आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवेल. योगराज यांनी आक्रमक पद्धतीने आपली भूमिका मांडली.

“एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर शांत बसून ती पाहत राहणं हे मला जमत नाही. मी नेहमी खरं बोलणारा माणूस आहे, ज्यावेळी मी खरं बोलायला सुरुवात करेन त्यावेळी कोणीही बोलू शकणार नाही. मी आता आरोप करुन विश्वचषकात संघाचं मनोधैर्य कमी करणार नाही.” योगराज पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh father yograj singh to expose ms dhoni soon psd
First published on: 15-06-2019 at 14:17 IST