Yuvraj Singh Tino Best Video: सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स संघाने ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज मास्टर्सचा पराभव करून इंटरनॅशनल मास्टर्स लीग या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इंटरनॅशनल मास्टर्स लीग पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आणि भारत मास्टर्स संघाने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. या सामन्यात अंबाती रायडू, सचिन तेंडुलकर आणि विनय कुमार यांनी इंडिया मास्टर्ससाठी चमकदार कामगिरी केली. तर सामन्यादरम्यान युवराज सिंग आणि वेस्ट इंडिज खेळाडूमधील वादाने सर्वांचे लक्ष वेधले.

युवराज सिंग नेहमीच त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी आणि आक्रमकतेने खेळण्यासाठी ओळखला जातो. युवराजची झंझावाती फलंदाजी तर आपण पाहिली पण अंतिम फेरीत संतापलेला युवराजही पाहायला मिळाला. इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्स संघाने प्रथम फलंदाजी करत १४८ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया मास्टर्स संघ चांगल्या स्थितीत दिसत होता आणि १३व्या षटकात अंबाती रायडू आणि युवराज सिंग त्यांच्यासाठी फलंदाजी करत होते.

दरम्यान, १३वे षटक संपल्यानंतर युवराज आणि वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज टिनो बेस्ट यांच्यात वादावादी सुरू झाली. १३ वे षटक टिनो बेस्टने टाकल्यानंतर तो मैदानाबाहेर जात होता. पण युवराजने याबद्दल पंचांना सांगितले आणि त्यामुळे टिनो बेस्टला मैदानात परत यावे लागले आणि यानंतर युवराज सिंग आणि टिनो बेस्ट यांच्यात वाद सुरू झाला. वाद चांगलाच चिघळल्याचे पाहून मैदानावरील इतर खेळाडू पुढे आले आणि त्यांनी प्रकरण शांत केलं.

अंबाती रायुडूने इंडिया मास्टर्ससाठी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने ५० चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांसह ७४ धावा केल्या. त्याच्याशिवाय सचिन तेंडुलकरने २५ धावांचे योगदान दिले. या दोन खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करून इंडिया मास्टर्सच्या विजयाचा पाया रचला होता. नंतर युवराज सिंग आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी काही शानदार फटकेबाजी करत संघाला विजयापर्यंत नेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर गोलंदाजीत विनय कुमारने अप्रतिम कामगिरी करत तीन विकेट घेतले होते. तर शाहबाज नदीम दोन विकेट मिळवण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात अंबाती रायुडूच्या स्फोटक ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर इंडिया मास्टर्स संघाने १८ व्या षटकात केवळ ४ गडी गमावून लक्ष्य गाठले आणि अंतिम सामना ६ विकेटने जिंकला.