Yuzvendra Chahal Statement on Dhanashree Verma Allegations: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा २० मार्च २०२५ रोजी घटस्फोट होऊन ते वेगळे झाले. २२ डिसेंबर २०२०ला त्यांचं लग्न झालं होतं. पण, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. त्यानंतर, अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की हे दोघे २०२२ पासून वेगळे राहत होते. अखेरीस दोघांनी घटस्फोट घेत यावर दोघेही वेगळे झाले. दरम्यान हल्लीच धनश्रीने चहलवर फसवणूक केल्याचे आरोप केले होते. यावर त्याने वक्तव्य केलं आहे.

धनश्रीने नुकतेच चहलवर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिने एका रिअॅलिटी शोमध्ये सांगितलं की, लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच चहलने तिची फसवणूक केली होती. युजवेंद्र चहलने आता या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

युजवेंद्र चहलने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान धनश्री वर्माने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना चहल म्हणाला, “मी एक खेळाडू आहे आणि मी फसवणूक करत नाही. जर कोणी दोन महिन्यांत फसवणूक केली तर एखादं नातं इतके दिवस कसं टिकेल? माझ्यासाठी, हा विषय संपला आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे आणि इतरांनीही पुढे जावं.”

चहल पुढे म्हणाला, “आमचं लग्न ४.५ वर्षे टिकलं. जर दोन महिन्यांत फसवणूक झाली असतं तर नात पुढे टिकेल का? मी आधी सांगितलं आहे की मी भूतकाळ सोडून पुढे गेलो आहे. पण काही लोक अजूनही तिथेच अडकले आहेत. त्यांचं घर माझ्यामुळे चालत आहे, त्यामुळे त्या अशा चर्चा सुरू ठेवू शकतात. मला काही फरक पडत नाही.”

धनश्री वर्मा युझवेंद्र चहलबाबत काय म्हणाली होती?

धनश्री वर्मा सध्या राईज अँड फॉल या रिअॅलिटी शोचा भाग आहे. यादरम्यान तिला अभिनेत्री कुब्रा सैत हिने तिच्या नात्याबाबत विचारताच चहलवर आरोप केले होते. अभिनेत्री कुब्रा सैतने धनश्रीला विचारलं की तुमचं पती पत्नीचं नात तुटतंय असं तुला कधी जाणवलं? धनश्रीने उत्तर दिले, “मी पहिल्या वर्षी, दुसऱ्याच महिन्यात त्याला माझी फसवणूक करताना पकडलं होतं.” तेव्हापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत.