Zimbabwe vs Afghanistan: अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये एकमात्र कसोटी सामना पार पडला. या सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानवर एक डाव आणि ७३ धावांनी दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेने ३५९ धावांचा डोंगर उभारला आणि २३२ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानचा डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. यासह झिम्बाब्वेने १४ वर्षांनंतर घरच्या मैदानावर खेळताना विजय मिळवला आहे.
टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये भागीदारीला फार महत्व नसतं. कारण वेगाने धावा करायच्या असतात. पण कसोटी क्रिकेटमध्ये भागीदारी करणं खूप महत्वाचं असतं. अफगाणिस्तानचे फलंदाज भागीदारी करण्यात अपयशी ठरले. अफगाणिस्तानकडून पाचव्या विकेटसाठी केलेली ४९ धावांची भागीदारी ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना २७ वर्षीय वेगवान गोलंदाज रिचर्ड नगारवाने १३ षटकात ३७ धावा खर्च करून ५ गडी बाद केले. तर ब्लेसिंग मुजरबानीने ३, तनाका चिवांगाने २ गडी बाद केले.या दमदार गोलंदाजीच्या बळावर अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला.
बेन करनचं दमदार शतक
या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या झिम्बाब्वेने ३५९ धावांचा डोंगर उभारून २३२ धावांची भक्कम आघाडी घेतली. झिम्बाब्वेकडून या डावात फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज बेन करनने १२१ धावांची दमदार खेळी केली. तर सिकंदर रझाने ६५ धावा केल्या. तर निक वलेचने ४९ आणि ब्रेड ईवांसने ३५ धावांची खेळी केली. यादरम्यान अफगाणिस्ताकडून गोलंदाजी करताना जियाऊर रहमानने ७ गडी बाद केले.
झिम्बाब्वेसाठी हा मालिका विजय खूप मोठा आहे. कारण झिम्बाब्वेला गेल्या १२ वर्षांत एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. १२ वर्षांनंतर झिम्बाब्वेने मायदेशात खेळताना पहिलाच सामना जिंकला आहे. तर २४ वर्षांनंतर झिम्बाब्वेने पहिल्यांदाच एका डावाने विजय मिळवला आहे. २००१ नंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. अफगाणिस्तानकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इब्राहिम जादरानने ४२ धावांची खेळी केली. तर बहिर शाहने ३२ धावांची खेळी केली. याआधी अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे झिम्बाब्वेविरूद्ध अफगाणिस्तानकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण असं होऊ शकलं नाही.