Wiaan Mulder Triple Century: दक्षिण आफ्रिकन क्रिकेटचा सुवर्णकाळ सुरु झाला आहे. काही दिवसांपू्र्वी दक्षिण आफ्रिकेने तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. यासह २७ वर्षांनंतर आयसीसीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकेचा दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातून संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची जबाबदारी केशव महाराजकडे सोपवण्यात आली. तर दुसऱ्या सामन्यात ही जबाबदारी वियान मुल्डरकडे सोपवली. ही जबाबदारी स्वीकारून त्याने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात त्रिशतकी खेळी करण्याचा ऐतिहासिक कारनामा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात या संघाची धूरा केशव महाराजच्या हातात होती. मात्र, तो दुखापतग्रस्त असल्याने दुसऱ्या सामन्यासाठी संघाचा कर्णधार बदलावा लागला. संघात इतर कुठलाही वरिष्ठ खेळाडू नसल्याने ही जबाबदारी वियान मुल्डरकडे सोपवण्यात आली.
कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात या पठ्ठ्याने असं काही करून दाखवलं आहे, जे कसोटी क्रिकेटच्या १५० वर्षांच्या इतिहासात कोणालाच जमलं नव्हतं. झिम्बाब्वेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत मुल्डरने २९७ चेंडूंचा सामना करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं त्रिशतक झळकावलं आहे. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात त्रिशतकी खेळी करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे. याआधी कुठल्याही कर्णधाराला आपल्या पहिल्याच सामन्यात असा कारनामा करता आलेला नाही. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या ५०० धावांच्या पार पोहोचवली आहे.
वियान मुल्डर हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. वियान मुल्डरने वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवलं. म्हणून आठव्या क्रमांकाला फलंदाजीला येणारा गोलंदाज अशी त्याची ओळख. पण, त्याचं फलंदाजीतील कौशल्य पाहून त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. पहिल्या सामन्यात त्याने ४४ चेंडू खेळून काढले आणि ६ धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याने केलेली खेळी अतिशय महत्वाची ठरली.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर मुल्डर फलंदाजीला आला आणि ५० चेंडूंचा सामना करत त्याने २७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने एडेन मारक्रमसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली. यासह गोलंदाजी करताना त्याने १ गडी बाद केला. झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने १४७ धावांची खेळी केली. तर गोलंदाजी करताना त्याने ४ गडी बाद केले.