झ्लटान इब्राहिमोव्हिचने झळकावलेल्या दोन अप्रतिम गोलांच्या बळावर पॅरिस सेंट जर्मेनने नान्तेस संघाचा २-१ असा पराभव करून फ्रान्स लीग चषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. इब्राहिमोव्हिचने पाचव्या मिनिटालाच गोल करत पॅरिस सेंट जर्मेनला आघाडीवर आणले. सामना संपायला नऊ मिनिटे शिल्लक असताना ऑलिव्हियर वेगनेऊ याने नान्तेसला बरोबरी साधून दिली. अखेरच्या क्षणी इब्राहिमोव्हिचने निर्णायक गोल करत तीन वेळा विजेत्या ठरलेल्या पॅरिस सेंट जर्मेनला अंतिम फेरी गाठून दिली. आता स्टेट डे फ्रान्स येथे एप्रिलमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत पॅरिस सेंट जर्मेन संघ चौथ्या विजेतेपदासाठी खेळेल. बुधवारी रात्री लिऑन आणि ट्रॉयेस यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.